Join us  

योगाला तुरुंगात ‘अच्छे दिन’!

By admin | Published: January 17, 2016 3:47 AM

तुरुंगाशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी आगामी काळात ‘योगाभ्यास’ हा अतिशय महत्त्वाचा भाग ठरणार असून, त्यांच्या एकंदरीत मूल्यमापनात योगाचा वाटा १० ते १५ टक्के असेल, अशी माहिती

- डिप्पी वांकानी, मुंबई

तुरुंगाशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी आगामी काळात ‘योगाभ्यास’ हा अतिशय महत्त्वाचा भाग ठरणार असून, त्यांच्या एकंदरीत मूल्यमापनात योगाचा वाटा १० ते १५ टक्के असेल, अशी माहिती गृहखात्याचे प्रमुख सचिव विजय सतबीरसिंग यांनी शनिवारी दिली. गृहखात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, येत्या मे महिन्यात तुरुंगातील कैद्यांची योगावर लेखी व तोंडी परीक्षा घेतली जाईल. परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कैद्यांना शिक्षेतून तीन महिन्यांची सूट दिली जाईल. योगगुरू बाबा रामदेव यांनी शनिवारी आॅर्थर रोड तुरुंगात कैद्यांसाठी योगशिबिर घेतले. यात पीटर मुखर्जी याने जोमाने पहिल्या रांगेतून सहभाग नोंदवला. दाऊदचा सहकारी मुस्तफा डोसा मात्र सहभागी झाला नाही. त्याने दुरूनच काय चालले आहे ते पाहिले. रमेश कदम व शीना बोरा खून प्रकरणातील आरोपी संजीव खन्ना यांना सुनावणीसाठी न्यायालयात नेण्यात आले होते. हे दोघेही राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत. गृहखात्याचे प्रमुख सचिव विजय सतबीरसिंग यांनी सांगितले की, या आर्थिक वर्षापासून तुरुंग अधीक्षक व जिल्हा पोलीस अधीक्षक पातळीवरील अधिकाऱ्याचे मूल्यमापन करताना, या अधिकाऱ्यांनी तुरुंगात योगाला किती प्राधान्य दिले, त्यांनी तुरुंगात योगाची किती शिबिरे घेतली व त्यात कैद्यांनी भाग घ्यावा म्हणून किती प्रयत्न केले, यावर भर दिला जाणार आहे. एकूण मूल्यमापनाच्या १० ते १५ टक्के भर योगावर असणार आहे. तुरुंग विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक भूषण उपाध्याय यांनी सांगितले की, येत्या मे महिन्यात तुरुंगातील कैद्यांची योगा विषयावर लेखी व तोंडी परीक्षा घेतली जाईल. त्यात सर्वोत्कृष्ट गुण मिळविणाऱ्या कैद्यांच्या शिक्षेत मी माझ्या अधिकारात तीन महिन्यांची सूट देणार आहे. सतबीरसिंग म्हणाले की, अलीकडेच मी इस्रायलला भेट दिली. तेथील तुरुंगात योगा शिकविला जातो हे मी पाहिले व बाबा रामदेव यांना शिबीर घेण्यासाठी निमंत्रित केले. कैदी मुळातच मानसिक तणावाखाली असल्यामुळे बेचैन असतात. ते कुटुंबापासून, समाजापासून दूर असतात. बऱ्याच घटना आमच्यापर्यंत येतही नाहीत. अशा कैद्यांना योगाचे शिक्षण दिले तर त्यांच्या मनात सकारात्मक बदल होतील, अशी अपेक्षा आहे.दुर्गुण माझ्या झोळीत टाका- बाबा रामदेव यांनी योग शिबिरात कैद्यांना कपालभाती, अनुलोम-विलोमसह विविध आसने शिकविली. रामदेव कैद्यांना म्हणाले, तुम्ही तुमचे दुर्गुण व तुम्ही कशामुळे तुरुंगात आला हे विसरून जा व या दोन्ही गोष्टी मला दानात देऊन टाका.- पिटर मुखर्जीसह जवळपास ७० टक्के कैद्यांनी रामदेव बाबांच्या या विधानाला प्रतिसाद देत आपले हात वर केले. हिरव्या रंगाचा टी शर्ट व क्रिम कलरची पँट परिधान केलेल्या मुखर्जी यांचे वजन कमी झाल्याचे जाणवत होते. त्यांनी बाबांचे म्हणणे कान देऊन ऐकले.