आपण बाळासाहेबांचे शिवसैनिक, भगव्याचे रक्षक; उद्धव ठाकरे आमदारांना काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 02:59 PM2022-06-21T14:59:44+5:302022-06-21T15:00:29+5:30

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांना वर्षावर बैठकीत उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. 

You are Balasaheb's Shiv Sainik, What did Uddhav Thackeray say to MLAs? | आपण बाळासाहेबांचे शिवसैनिक, भगव्याचे रक्षक; उद्धव ठाकरे आमदारांना काय म्हणाले?

आपण बाळासाहेबांचे शिवसैनिक, भगव्याचे रक्षक; उद्धव ठाकरे आमदारांना काय म्हणाले?

googlenewsNext

मुंबई - शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेत मोठी खळबळ माजली आहे. विधान परिषदेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे(Eknath Shinde) नॉट रिचेबल झाले. इतकेच नाही तर शिंदे समर्थक आमदारांचीही संपर्क होत नव्हता. त्यामुळे एकनाथ शिंदे कुठे गेले अशी चर्चा सुरू असतानाच शिंदे सुरतमधील एका हॉटेलमध्ये शिवसेनेच्या आमदारांसोबत असल्याचं समोर आले. त्यामुळे शिवसेनेत मोठी फूट पडल्याचं चित्र समोर आले. 

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांना वर्षावर बैठकीत उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. मात्र या बैठकीला शिवसेनेच्या ५५ पैकी केवळ १८ विधानसभेचे आमदार उपस्थित राहिल्याचं दिसून आले. त्यामुळे शिवसेनेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे आमदार आहेत. त्यासाठी हॉटेलबाहेर मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. तर भाजपामध्येही हालचाली सुरू झाल्या आहेत. 

वर्षावरील बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) म्हणाले की, आपल्या सरकारला काहीही धोका नाही. जे नाराज आहेत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. तुम्ही आणि आपण बाळासाहेबांचे शिवसैनिक, भगव्याचे रक्षक आहोत. आपल्याला एकत्र राहायचं आहे असा विश्वास त्यांनी आमदारांना दिला. मुंबईत सेंट रेजीस हॉटेलमध्ये शिवसेनेच्या आमदारांना ठेवण्यात आले आहे. त्या आमदारांसोबत शाखाप्रमुख, विभागप्रमुख आणि गटप्रमुख ही साखळी ठेवण्यात आली आहे. तुर्तास या आमदारांमध्ये कुठली फोडाफोड होऊ नये यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. तर त्याचसोबत एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून हटवून अजय चौधरी यांना जबाबदारी देण्यात आली. 

तर दुसरीकडे आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही अशा शब्दात बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवरून विधान केले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे पुढे काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. 

Web Title: You are Balasaheb's Shiv Sainik, What did Uddhav Thackeray say to MLAs?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.