‘तू पागल हैं!, तुझे हवा का पताही नहीं!’
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 12:48 AM2019-04-09T00:48:46+5:302019-04-09T00:49:03+5:30
चाळीस मिनिटांचा प्रवास । ट्रेनने प्रवास करताना ‘लोकमत’ने जाणून घेतले जनतेचे ‘मत’
- सुनील पाटोळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गर्दीने खच्चून भरलेली ट्रेन... वेळ संध्याकाळची चारची, गाडीने डोंबिवली सोडलेली... अनेकांची व्यवस्थित उभे राहायला मिळावे यासाठीची ढकलाढकली सुरू असतानाच सीटवर बसलेल्या व्यक्तीच्या आवाजाने लक्ष वेधून घेतले. ‘अरे काल आमच्या साहेबांनी काय मस्त ठोकली... आता बघा आगे आगे होता हैं क्या!’ कल्याण किंवा त्याही मागून बसून आलेल्या एका त्रिकूटात राजकीय गप्पांचा फड रंगला होता. जिग्नेश शहा नावाची व्यक्ती विरुद्ध सदानंद मोरे, परेश पाटील अशी जुगलबंदी सुरू झाली होती. प्रत्येक जण आपला मुद्दा एखाद्या टीव्ही शोमध्ये सहभागी झाल्याप्रमाणे अगदी त्वेषाने मांडत समोरचा कसा चुकीचा आहे ते सांगत होते.
...तर आमच्या साहेबांचं भाषण, या मोरेंच्या वक्तव्यावर शहा लगेच उत्तरला. ‘अरे तुम्हारा साहब तो फेल हैं फेल! एक विधायक नहीं, एक नगरसेवक नहीं. क्या हैं तुम्हारे साहब के पास? इलेक्शन तो लडता नहीं ! आता लोकसभा नको, विधानसभा बघू म्हणतो, उद्या विधानसभा आली की, महापालिका, नंतर मग ग्रामपंचायत लढू असे तुमचा साहेब म्हणेल!’ इतक्यात या दोघांच्या संवादात परेश पाटीलने उडी घेतली. ‘अरे तुमच्या मोदी साहेबांच्या पक्षात निवडणूक लढवायला माणसं कुठे आहेत? म्हणून तुम्हाला इकडून तिकडे पळवापळवी करावी लागते. निवडणुका आल्या की तुम्ही जागे होता. जरा कल्याणमध्ये फिरून बघा, आता तुमच्या पक्षाची किती संपर्क कार्यालये सुरू झाली आहेत. पण ती सगळी नावापुरती, दोन महिने सुरू राहणार, मटनाच्या पार्ट्या होणार, मग निवडणूक संपली की कार्यालये बंद. आमच्या सेनेचे तसे नाही. आमच्या शाखा रोज सकाळ, संध्याकाळ सुरूच असतात. आमचा शाखाप्रमुख नगरसेवकाच्या बरोबरीचेच काम करतो.’
शहाने या सैनिकालाही सोडले नाही, ‘अरे पण पैसे खायलाही हा तुमचा शाखाप्रमुखच पुढे असतो!’ या थेट हल्ल्याने बावरलेल्या पाटीलने थोडेसे सावरत आरोपाचा इन्कार करत पुन्हा मूळ मुद्द्याकडे मोर्चा वळवला. ‘तुमच्याकडे उमेदवार कुठे आहेत? आमच्याकडे ठाण्यातच बघा.’ चार-पाच नावे त्याने शहाच्या तोंडावर फेकली. बॅकफूटवर गेलेल्या शहाने हा वारही परतवला, ‘म्हणूनच तुमच्याकडे उमेदवारी मिळाली नाही की तुमचे ते निष्ठावान म्हणवणारे आमच्याकडे येतात!’ पाटील त्यावरही उत्तरला, ‘खूप पर्याय असेल तरी जागा कोणा एकालाच मिळणार, पण संघटना म्हणून आमची ताकद बघा!’ ‘एक दिवस मी तुमच्या मुलाला फिरायला घेऊन गेल्याने बाप म्हणून तुम्ही असमर्थ ठरत नाही. तुमच्याकडे उमेदवार नाहीत हे मान्य करा.’
शहा चर्चेत मागे पडतोय हे पाहताच इतका वेळ शांत बसलेल्या मोरेलाही आता जोश आला. तोही चर्चेत सहभागी झाला. ‘...म्हणूनच तर आमचे साहेब काल म्हणाले, यांच्या... लाथ मारून हाकलून द्या!’ त्यावर शहा, ‘अरे तुम्हारे साहब की तो बात ही मत कर, उसको पुछता कौन हैं!’ पाटील उवाच, ‘अरे मैदान में आया नही, तो अबसे आप लोग इतने डर गये हो! महाराष्ट्रात आणखी सभा होऊ देत. प्रत्येक सभेला तुमचा एक खासदार कमी या हिशेबाने तुमच्या विकेट घेतात ते बघतच जा!’ शहा मोरेकडे बघून, ‘अरे तू पागल हैं, तुझे हवा का पताही नहीं’ असे म्हणत हसतो.
मोरे त्यावरही काहीतरी बडबडतो, एव्हाना दादर स्टेशनवर उतरायची वेळ झाल्याने ते नीटसे ऐकू येत नाही. त्यामुळे त्या त्रिकूटामधील चर्चेत कोण बाजी मारते ते समजत नाही. नेहमीच्या ग्रुपमधील एकमेकांच्या ओळखीची ही मंडळी. त्यामुळे एका दिवसात ही चर्चा संपणार नाही. निवडणूक संपेपर्यंत रोजच्या प्रवासात याचे अनेक भाग नवनव्या मुद्द्यांसह रंगत जातील एवढे नक्की.