Join us

तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 8:22 PM

Lok Sabha Election 2024 : जीव गेला तरी बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटावर हल्ला चढवला.

मुंबई : उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीचे वारसदार आहेत. मात्र, आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार आहोत, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. आज मुंबईत दादर येथील शिवाजी पार्कवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महायुतीची सभा होत आहे. यावेळी जीव गेला तरी बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटावर हल्ला चढवला.

शिवाजी पार्क मैदानात गर्व से कहो हम हिंदू ही डरकाळी घुमत होती, पण आता उबाठाला हिंदू म्हणायची लाज वाटू लागली  आहे. उबाठाला हिंदू म्हणवून घ्यायची लाज वाटत आहे, हिंदूहृदयसम्राट म्हणायला जीभ कचरू लागली आहे, मतांसाठी लाचारी सुरू असल्याची टीका एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. माणूस किती बदलला हे पाहू शकतो, पण इतक्या वेगाने रंग बदलताना सरडा पाहिला नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे हे रंग बदलणारे सरडा असल्याची एकनाथ शिंदे यांनी टीका केली. 

पुढे एकनाथ शिंदे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेण्याचा यांना नैतिक अधिकार नाही. तुम्ही आता बाळासाहेबांचा नाव घेण्याचा अधिकार सोडलेला आहे. काँग्रेसमध्ये उबाठा लोळत आहेत, बिघडलेलं पोरगं चुकीच्या वाटेला लागलं असं आपण म्हणतो. त्यात हे म्हणतात माझा बाप चोरला, अरे हे काय खेळणं आहे का? आम्हाला फक्त बाळासाहेबांचे विचार हवेत, तीच आमची संपत्ती असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर मुंबईत एकही हल्ला झाला नाही. कारण मुंबईत काही जरी झाले, तरी मोदी पाकिस्तानात घुसून मारतील, हे पाकिस्तानला माहिती आहे. आज देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षात एकही सुट्टी घेतली नाही. आज जगभरात देशाचे नाव झाले आहे. आज जगभरातील नेते मोदींची स्वाक्षरी घेतात, त्यांच्यासोबत फोटो काढतात, त्यांचा आदर करतात, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

टॅग्स :एकनाथ शिंदेमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४मुंबईलोकसभा निवडणूक २०२४