कोठडी मृत्यू प्रकरणाच्या तपासाबाबत तुम्ही गंभीर नाही; अक्षय शिंदे चकमकप्रकरणी उच्च न्यायालयाचे सीआयडीवर ताशेरे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 05:44 AM2024-12-03T05:44:44+5:302024-12-03T05:45:12+5:30
सीआयडी सक्षम असल्यामुळे स्थानिक पोलिसांकडून सीआयडीकडे तपास वर्ग केला जातो, असे उपाहासात्मक भाष्य न्यायालयाने केले.
मुंबई : बदलापूर शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या पोलिस कोठडी मृत्यूप्रकरणाचा तपास गांभीर्याने न केल्याबद्दल उच्च न्यायालयाने सोमवारी सीआयडीवर ताशेरे ओढले. सीआयडीचे वर्तन संशयास्पद आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.
न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने, “सध्याच्या तपासात सीआयडीच्या वर्तनामुळे संशय निर्माण होतो,” अशी टिप्पणी केली. सीआयडी सर्व माहिती या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या न्यायदंडाधिकाऱ्यांना देऊ इच्छित नाही, असा चुकीचा निष्कर्ष काढला जाईल, असेही न्यायालय म्हणाले.
सीआयडी सक्षम असल्यामुळे स्थानिक पोलिसांकडून सीआयडीकडे तपास वर्ग केला जातो, असे उपाहासात्मक भाष्य न्यायालयाने केले. तसेच तपासातील त्रुटी आणि न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे सादर केलेली कागदपत्रे पाहून खंडपीठाने संताप व्यक्त केला. ‘‘या प्रकरणाचा तपास सीआयडी सहज कसे घेऊ शकते? हे प्रकरण कोठडी मृत्यूशी संबंधित आहे. तुमच्याकडून काय अपेक्षा केली होती आणि आता काय अपेक्षा करणार? तुमच्या वर्तनामुळे तुम्ही स्वत:बद्दलच संशय निर्माण करून घेत आहात. काय तपास करत आहात?’’ असा संताप न्यायालयाने व्यक्त केला.
न्यायालय काय म्हणाले?
प्रकरणाशी संबंधित वैद्यकीय कागदपत्रे जमा करण्यात सीआयडी टंगळमंगळ करत असल्याने न्यायालयाने सुनावले. ‘‘सीआयडी योग्य प्रकारे माहिती का गोळा करत नाही? आमच्या संयमाची परीक्षा पाहू नका. वैद्यकीय कागदपत्रे गोळी केली जात नाही. तुम्ही जाणूनबुजून दंडाधिकाऱ्यांना माहिती देत नाही, असा निष्कर्ष आम्ही काढत आहोत”, असे न्यायालयाने खडसावले. तपास नीट करा आणि सर्व साक्षीदारांचे जबाब न्यायदंडाधिकाऱ्यापुढे सादर करा. ते सादर केले तरच दंडाधिकारी योग्य अहवाल देऊ शकतील, असेही न्यायालयाने म्हटले.
प्रकरण काय?
बदलापूरमधील एका शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी अक्षय शिंदे याला अटक केली होती. तो पोलिस कोठडीत असताना २४ सप्टेंबर रोजी कथित पोलिस चकमकीत ठार झाला होता. चकमकीची चौकशी सीआयडीकडे सोपवण्यात आली आहे.