- दा. कृ. सोमण
यावर्षी सोमवार, १५ फेब्रुवारी रोजी मध्यान्हकाळी आणि प्रदोषकाळी माघ शुक्ल चतुर्थी असल्याने याच दिवशी श्रीगणेश जयंती, विनायक चतुर्थी, तिलकुंद चतुर्थी आणि वरद चतुर्थी आहे. अजूनही जगावर कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे आत्तापर्यंत जसे आपण शिस्तीने व सर्व नियम पाळून उत्सव साजरे करीत आलो त्याप्रमाणेच यावर्षीची गणेश जयंतीही साजरी करावयाची आहे.
...........................................
गणपती हा विघ्नहर्ता आहे. कोरोनाचे विघ्न भारतीय आरोग्य कर्मचारीवर्गाने केलेल्या उत्तम कामगिरीमुळे आणि बहुतेक सर्वांनी पाळलेल्या शिस्तीमुळे हळूहळू दूर होत चालले आहे. हे जरी असले तरी कोरोनाचा धोका अजून पूर्णपणे गेलेला नाही म्हणून गणेश जयंतीचा उत्सवही यावर्षी संयमाने व कोरोनाविषयीचे सर्व नियम पाळूनच साजरा करावयाचा आहे.
गणपतीचे एकूण तीन अवतार मानले गेले आहेत. या तीन अवतारांचे तीन जन्मदिवस आपण साजरे करीत असतो. पहिला अवतार वैशाख पौर्णिमेच्या दिवशी ‘पुष्टिपती विनायक जयंती’ म्हणून आपण साजरा करीत असतो. दुसरा अवतार भाद्रपद शुक्ल चतुर्थीला ‘श्रीगणेश चतुर्थी’ म्हणून पार्थिव गणेश पूजन करून आपण साजरा करीत असतो. तिसरा अवतार हा माघ शुक्ल चतुर्थीला ‘गणेश जयंती’ म्हणून आपण साजरा करीत असतो.
माघ महिन्यातील पूजावयाची मूर्ती ही मातीची किंवा धातूचीही चालते. तसेच भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला जशी घरोघरी मातीच्या गणेशमूर्तींची पूजा केली जाते, तशी माघातील गणेश जयंतीला प्रत्येक घरी पूजा केली जात नाही. तशी परंपरा किंवा प्रथाही नाही. गणेशमूर्तीची नेमकी किती दिवस पूजा करून मूर्तीचे विसर्जन करावयाचे तेही कोणत्याही मान्यवर धर्मशास्त्रग्रंथात सांगितलेले नाही. काही ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरे केले जातात. काही कुटुंबात गणेश जयंतीला परंपरेप्रमाणे व्रत केले जाते.
गणेश जयंतीच्या दिवशी ढुंढिराजाचे पूजन करावे आणि तीळसाखरेचे किंवा तीळगुळाचे मोदक अर्पण करावेत, असे सांगण्यात आले आहे. दिवसभर उपवास करून सूर्यास्तानंतर आकाशात नक्षत्रतारका दिसू लागल्यावर भोजन करण्याचीही प्रथा आहे. गणेशाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या कुटुंबात ‘विनायक’ या नावाने अवतार घेतला म्हणून ही विनायकी चतुर्थी जास्त प्रसिद्ध आहे.
या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी म्हणतात. षोडशोपचार गणेशपूजन करून तीळमिश्रित गुळाच्या लाडवाचा नैवेद्य अर्पण करतात. कुंदफुलांनी गणेशाची आणि सदाशिवाची पूजा करून रात्री जागरण करतात म्हणून या चतुर्थीला ‘तिलकुंद चतुर्थी’ असेही म्हणतात. या तिथीला स्नान, दान, जप व होम कर्म केल्यास गणेशकृपा राहते, अशीही उपासकांची श्रद्धा असते.
ढुंढिविनायक
गणेशाला ढुंढिराज हे नाव कसे पडले, याविषयी स्कंदपुराणात एक कथा आहे. दिवोदास नावाचा राजा काशीमध्ये राहून राज्य करीत होता. त्यावेळी सर्व देव काशी नगरी सोडून निघून गेले. परंतु काशी नगरीचा विरह भगवान शंकरांना सहन झाला नाही. भगवान शंकरांनी काशी नगरीतून दिवोदासचे उच्चाटन करण्यासाठी गणेशाला त्याच्या गणांसह काशी नगरीत पाठवले. गणेशाने ज्योतिषी बनून काशी नगरीत प्रवेश केला. त्याने या विद्येमुळे काशी नगरीत लोकप्रियता मिळविली. दिवोदासाच्या राजवाड्यातही गणेशाने ज्योतिषामुळे प्रवेश मिळवला. ज्योतिषी स्वरूपात वावरणाऱ्या गणेशाने दिवोदासाला भविष्यही सांगितले. त्यामुळे दिवोदासचे काशी नगरीतून उच्चाटन झाले. मंदार पर्वतावरून शंकराचे काशी नगरीत आगमन झाले. तसेच सर्व देवही काशी नगरीत आले. भगवान शंकर गणेशावर प्रसन्न झाले. त्यांनी गणेशाला ‘ढुंढिराज’ हे नाव बहाल केले. त्या वेळेपासून काशी नगरीत ढुंढिविनायक प्रसिद्ध झाला. काशी नगरीत ढुंढिविनायकाचे प्रसिद्ध मंदिर आहे.
आधुनिक काळात
आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, वस्त्र, यज्ञोपवीत, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, मंत्रपुष्प, प्रदक्षिणा आणि नमस्कार या सोळा उपचारांनी केलेली पूजा म्हणजे षोडशोपचारपूजा होय. कोणत्याही देवतेची पूजा आपण का करतो? त्या देवतेचे गुण आपल्या अंगी यावेत, यासाठी ती देवता आदर्श मानून त्या गुणांची पूजा आपण करीत असतो. गणपती हा चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती आहे. आपणही आयुष्यात विद्या - कला अवगत केल्या तर आपले जीवन आपण सुखी व आनंदी करू शकतो. गणपतीची उपासना म्हणजे विद्या-कला यांची उपासना! तप म्हणजे मेहनत! भक्ती म्हणजे ही साधना करताना साधावयाची एकाग्रता होय. गणपती हा सुखकर्ता व दु:खहर्ता आहे. आपणही गरीब, दीनदुबळ्या लोकांच्या जीवनातील दु:ख कमी करून सुखी होण्यासाठी त्यांना मदत करायला पाहिजे. गणेश हा गणांचा नायक होता. तो लढवय्या होता, तो चतुर होता. आपणही त्याचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून तसे बनण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. मन पवित्र ठेवले तर आपल्या हातून पवित्र कार्य घडण्यास मोठी मदत मिळत असते. गणेशपूजा ही त्यासाठीच करावयाची असते.
गणपतीने देवान्तक, नरांतक आणि इतर अनेक दुष्ट राक्षसांचा नाश केला. आपल्या अंगीही गणेशाचे गुण बाणवून आपल्यातील आणि समाजातील अस्वच्छता, अनिती, अनाचार, आळस, अंधश्रद्धा, अनारोग्य इत्यादी राक्षसांचा नाश करावयाचा आहे. गणेश हा मातृभक्त होता. भारतीय कुटुंब व्यवस्था ही जगात उत्कृष्ट आहे. भारतीय संस्कृती ही एक आदर्श संस्कृती आहे. आज अनेक देशांत भारतीय लोक गेलेले आहेत. तेथे ते आपले सण - उत्सव साजरे करीत असतात. गणेशोत्सव हा तर लोकप्रिय उत्सव आहे. तो खऱ्या अर्थाने ग्लोबल उत्सव झाला आहे. गणेश उपासनेमुळे कोरोनासारख्या संकटांवर मात करण्यासाठी आपणा सर्वांस मनोबल प्राप्त होवो, हीच प्रार्थना करतो.
(लेखक पंचांगकर्ता, खगोल अभ्यासक आहेत.)