"तुम्हीच संस्कृतीच्या वाहक"; राज ठाकरेंनी शुभेच्छा देत महिलांकडून व्यक्त केली 'ही' अपेक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 10:42 AM2024-03-08T10:42:01+5:302024-03-08T10:48:01+5:30
राज ठाकरे नेहमीच आपल्या वेगळेपणामुळे चर्चेत असतात. राजकारण असो किंवा कला, संस्कृती त्यांची कल्पकता प्रभावी दिसते.
मुंबई - जगभरात आज जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. कधी काळी भारत देशात चूल आणि मूल अशीच धारणा होती. मात्र, चूल सांभाळणारी, कधी घर सांभाळणारी महिला आज देशांचं बजेट सांभाळतेय ही भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. देशाच्या सर्वोच्च राष्ट्रपती पदावरही आज महिलाच आहे. त्यामुळे, देशातील हा बदल निश्चितच कौतुकास्पद आहे. विविध क्षेत्रातील यशस्वी महिलांच्या उपस्थितीत अनेक ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सोशल मीडियातूनही महिलांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही महिला दिनाच्या शुभेच्छा देताना महिलांकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.
राज ठाकरे नेहमीच आपल्या वेगळेपणामुळे चर्चेत असतात. राजकारण असो किंवा कला, संस्कृती त्यांची कल्पकता प्रभावी दिसते. अनेकदा विशेष दिवस साजरे करतानाही त्या दिवसांचे महत्त्व वेगळ्या धाटणीने मांडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आज जागतिक महिला दिन साजरा होत असतानाही त्यांनी महिलांना संस्कृतीचे वाहक संबोधले आहे. तसेच, या महिला भगिनींकडून काही अपेक्षाही व्यक्त केल्या आहेत.
''आज जागतिक महिला दिन, त्याबद्दल तमाम माता-भगिनींना मनःपूर्वक शुभेच्छा. आजच्या दिवशी महाराष्ट्रातील तमाम माता-भगिनींना माझी विनंती आहे म्हणा किंवा तुमच्याकडून माझ्या काही अपेक्षा आहेत म्हणा. कुठल्याही संस्कृतीच्या वाहक ह्या महिलाच असतात. जेव्हा आपण संस्कृती म्हणतो त्यात भाषा येते, खाद्यपरंपरा येते, लोकगीतं येतात, विविध परंपरा येतात, मान्यता येतात, ह्या सगळ्या गोष्टी पिढ्यानपिढ्या पुढे जातात, त्या स्त्रियांमुळेच'', असे राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
आज जगभर ब्रँड संस्कृतीच्या आड, आणि एकजिनसीपणाच्या नावाखाली स्थानिक संस्कृतीच नष्ट करायला सुरुवात झाली आहे. हे आपल्यासारख्या समृद्ध संस्कृतींना घातक ठरू शकतं. म्हणून आपली खाद्यपरंपरा असेल, म्हणी असतील, गाणी असतील, ओव्या असतील, लोकगीतं असतील, लोककथा असतील सगळं लिखित किंवा आता व्हिडीओजच्या स्वरूपात जतन करून ठेवा. कारण, मी म्हणलं तसं संस्कृतीच्या वाहक तुम्हीच असता. ह्याचा अर्थ तुम्ही फक्त पारंपरिक गोष्टींमध्ये अडकून पडा असं अजिबात नाही. आज तुम्ही जगाला गवसणी घालतच आहात, ते प्रशंसनीयच आहे. पण जुन्या नव्याचा संगम हा स्त्रियाच साध्य करू शकतात, असे राज ठाकरेंनी म्हटले आहे.
दरम्यान, राज ठाकरेंनी महिलांना आपल्या संस्कृतीला रुजवण्याचे आणि संस्कृती व परंपरेला जतन करण्याचे आवाहन केले आहे.