महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री तुम्ही आहात..; रितेशने सांगितली भावनिक आठवण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 06:50 AM2023-04-28T06:50:16+5:302023-04-28T06:50:52+5:30
जेनिलियाला मुख्य भूमिकेसाठी का साईन केलं असं मला बरेच लोक विचारतात.
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे माझ्या थोरल्या बंधूंसारखे आहेत. तुमचे प्रेम आणि आपुलकी सदैव आमच्या परिवाराबरोबर असेल. आपल्या परिवाराचे संबंध फार जुने आहेत. १९९९ मध्ये जेव्हा माधवराव शिंदे होते, तेव्हा ते माझ्या वडिलांना म्हणाले होते, की महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री तुम्ही आहात. ती आठवण आणि हे प्रेम आपल्या परिवारामध्ये सदैव राहील. त्यासाठी खूप खूप आभार, अशा शब्दात रितेश देशमुख यांनी जुन्या आठवणी जागवल्या.
जेनिलियाला मुख्य भूमिकेसाठी का साईन केलं असं मला बरेच लोक विचारतात. प्रत्येक नवऱ्याला वाटतं की, कधीतरी बायकोला म्हणावं बस्स, कट... हे सर्वांना शक्य नाही, पण माझ्या व्यवसायामुळे मला ते शक्य झालं. बऱ्याच जणांना असं वाटतं की, घरी जाऊन आपल्या बायकोला म्हणावं की आता बस झालं... कट. मी तुला नंतर बोलवतो, पण त्यांना ते शक्य होत नाही. ते मी शक्य करून दाखवलं.
‘लोकमत’ डिजिटलच्या जगात इतरांपेक्षा कितीतरी पुढे : रितेश
मोठे चित्रपट आले, की आम्हाला जास्त स्क्रीन्स मिळत नाहीत. प्रयत्न नेहमीच केले जातात, पण ‘लोकमत’चा मी खूप खूप आभारी आहे. व्यवसायाच्या पुढे जाऊन ते मराठी चित्रपटांना सपोर्ट करतात. केवळ ‘वेड’साठी नाही, तर त्यांचे सर्व प्लॅटफॅार्म्स इतर सर्व मराठी चित्रपटांना समान संधी मिळावी, म्हणून प्रयत्न करतात. आज ‘वेड’ किंवा त्यानंतर रिलीज झालेले चित्रपट पाहता डिजिटल माध्यमाद्वारे लोकांपर्यंत कसे पोहोचवावं हे खरं ‘लोकमत’कडून शिकण्यासारखं आहे. ‘लोकमत डिजिटल स्पेस’मध्ये लोकमत खूप पुढे आहे. त्यांची खरंच आम्हाला फार मदत झाली, अशा शब्दांत रितेश देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘वेड’ चित्रपटाने विक्रम नोंदवला. त्याआधीचे रितेश देशमुख आणि नंतरचे रितेश देशमुख यांच्यात काय बदल झाला असे विचारताच रितेश म्हणाला, मला काही फरक जाणवला नाही. ‘वेड’च्या अगोदर मी फक्त एक अभिनेता म्हणून ओळखला जात होतो. आता बहुतेक दिग्दर्शक-अभिनेता म्हणून ओळखला जातो. इतकाच फरक आहे. तेव्हाही काम नव्हतं आणि आजही काम नाही.