मुंबई - बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येची चौकशी सीबीआयकडे देण्यात यावी अशी मागणी पार्थ पवार यांनी केली होती. त्यानंतर पार्थच्या या मागणीवर आजोबा शरद पवार यांनी चांगलीच कानउघडणी केली. मी माझ्या नातवाच्या मागणीला कवडीची किंमत देत नाही अशा शब्दात पवारांनी पार्थ यांचे कान टोचले. त्यानंतर, भाजपा नेत्यांनी यावरुन राजकारण सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे. आमदार नितेश राणेंनी तर पार्थ लंबी रेस का घोडा असल्याचं म्हटलंय. आता, शरद पवार यांचे एकेकाळचे खंदे समर्थक आणि माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या नातवानेही या वादात उडी घेतल्याचं दिसून येतंय.
मुंबईत, पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, मी माझ्या नातवाच्या मागणीला कवडीचीही किंमत देत नाही. तो अजून इमॅच्युर आहे. सुशांत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची कोणतीही गरज नाही. मुंबई पोलिसांना मी गेल्या ५० वर्षापासून ओळखतो, त्यांच्यावर मला पूर्ण विश्वास आहे असं सांगत पवारांनी पार्थचं नाव न घेता फटकारलं होतं. त्यावर पार्थ पवार यांनी मला पवार साहेबांच्या वक्तव्यावर काहीच बोलायचं नाही. सुशांत सिंग राजपूत प्रकरण आणि शरद पवार यांच्या वक्तव्यावर विनाकारण मला कोणतंही वक्तव्य करायचं नाही असं ते म्हणाले. त्यानंतर, राजकीय वर्तुळात हा विषय चांगलाच रंगला आहे.
भाजपा नेत्यांकडून आणि विरोधकांकडून शरद पवार यांच्या या वाक्याचे भांडवल करत पार्थ पवार यांचं कौतुक करण्यात येतयं. आमदार नितेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन पार्थ पवार लंबी रेस का घोडा असल्याचे म्हटले आहे. काही सोशल मीडियावर भाजपा समर्थकांनी जय श्रीराम म्हणत पार्थ यांना समर्थन दर्शवल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर, आता माजी मंत्री आणि शरद पवारांचे जवळचे नातेवाईक पद्मसिंह पाटील यांच्या नातवानेही फेसबुक पोस्ट लिहून पार्थ यांचं कौतुक केलंय. 'आपण उस्मानाबादचे आहोत, कसं लढायचं हे आपल्याला माहित आहे. तुम्ही जन्मापासूनच योद्धे आहात, हे मी लहानपणीपासूनच पाहत आलोय,'' असे म्हणत मल्हार पाटील यांनी पार्थ यांचं समर्थन केलंय. दरम्यान, विधानसभा निवडणुकांवेळीच माजी मंत्री राणा जगजितसिंह पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. त्याच, राणा जगजितसिंह पाटील यांचे मल्हार हे चिरंजीव आहे.
दरम्यान, दिवसभरातील या चर्चेनंतर रात्री शरद पवारांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठकही पार पडली. या बैठकीत अजित पवार, सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. या बैठकीत काय चर्चा होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. काही नाही. त्यामुळे याबाबत अधिक चर्चा करण्याची आवश्यकता नाही" याचबरोबर, ही बैठक कालच ठरली होती. यात पार्थ पवार संबंधित कोणताही विषय चर्चेत आला नाही. इतर महत्त्वांच्या विषयांवर चर्चा झाली. पार्थ पवार यांचे विधान त्यांचे वैयक्तिक मत असू शकते. पण याबाबत कोणताही कौटुंबिक वाद नाही. पवार कुटुंबात कोणतेही वाद नाहीत, असे जयंत पाटील यांनी सांगितले.