"तुम्ही धनुष्यबाण घेऊन या, मी मशाल घेऊन येतो अन्...", उद्धव ठाकरेंचं CM शिंदेंना खुलं आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 02:35 PM2023-02-18T14:35:52+5:302023-02-18T14:37:16+5:30
शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगानं काल संध्याकाळी जाहीर केला.
मुंबई-
शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगानं काल संध्याकाळी जाहीर केला. यानंतर ठाकरे गटाकडून तीव्र संताप आणि निषेध व्यक्त केला जात आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आज मुंबईत 'मातोश्री' बाहेर प्रचंड गर्दी केली आहे. कार्यकर्त्यांकडून शिंदे यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी सुरू असून कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खुलं आव्हान दिलं आहे.
"तुम्ही ज्यापद्धतीनं धनुष्यबाण चोरला आहे ना...त्या चोरांना माझं आव्हान आहे. तुम्ही धनुष्याबाण घेऊन या...मी मशाल घेऊन येतो. होऊ द्या निवडणूक", असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. 'मातोश्री' बाहेर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली असून सर्वांना मार्गदर्शन करण्यसाठी उद्धव ठाकरे थोड्याच वेळात ओपन कारमधून संबोधित करणार असल्याचीही माहिती मिळाली आहे.
निवडणूक आयोगाच्या कालच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदार, खासदार आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक आज बोलावली होती. या बैठकीत सामील होण्याआधी उद्धव ठाकरे यांनी मातोश्री बाहेर येऊन उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केलं आणि थेट मुख्यमंत्री शिंदे यांना निवडणुकीला सामोरं जाण्याचं आव्हान दिलं.