मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना त्यांचे पुतणे राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी दुसऱ्यांदा राजकीय धक्का दिलाय. पुन्हा एकदा भाजपासोबत जात अजित पवारांनी सरकारमध्ये एंट्री केलीय. विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली असून महाविकास आघाडीतून बाहेर पडल्याचे आता उघड झालंय. काही दिवसांपूर्वी एका पत्रकाराच्या प्रश्नावर अजित पवारांनी उत्तर देताना, पुढील निवडणुका ह्या आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढवू, असे म्हटले होते. त्यावेळी, तू स्टँप आण, मी लिहून देतो, असेही ते म्हणाले होते. मात्र, आज त्यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली.
महाविकास आघाडीत लोकसभा निवडणुकांसाठी जागा-वाटपावरुन चर्चा सुरू असताना प्रमुख नेत्यांची विधानं चर्चेचा विषय ठरत होता. त्यातच, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी १९ जागांवर दावा केला आहे. त्यामुळे, महाविकास आघाडीत बिघाडी होईल का, यासंदर्भात पत्रकाराच्या प्रश्नांवर अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केली होती.
महाविकास आघाडी लोकसभा निवडणुकीत एकत्रितपणे लढणार का, या प्रश्नावर अजित पवार यांनी स्पष्टच उत्तर दिले. १०० टक्के एकत्र राहणार आहे, तू स्टँप आण, मी लिहून देतो तुला. मी, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले सह्या करुन देतो तुला, असे म्हणत अजित पवार यांनी त्यांच्या स्टाईलने महाविकास आघाडी एकत्रितपणेच निवडणुका लढवणार असल्याचे उत्तर पत्रकाराला दिले होते. मात्र, आज अजित पवारांनी पुढील सर्व निवडणुका आपण, भाजप-शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी म्हणून लढवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे, अजित पवारांनी आपला शब्द फिरवला हे दिसून आले.
काय म्हणाले अजित पवार
अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर पुन्हा एकदा राज्यातील राजकारणाला नवी कलाटणी मिळाली आहे. अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचं कौतुक करत, पुढील निवडणुका मोदींसोबत लढणार आहोत. आम्हीच राष्ट्रवादी काँग्रेस आहोत आणि घड्याळ चिन्हावर आपण ह्या निवडणुका लढवणार, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. दरम्यान, शरद पवार यांनी ह्या बंडाला आणि अजित पवारांच्या शपथविधीला आपले समर्थन नसल्याचे म्हटले.