Join us

"तू स्टँप पेपर आण, मी लिहून देतो"; त्या प्रश्नावर अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 12:09 PM

शिवसेना गेल्यावेळी जिंकलेल्या १८ जागा लढवेलच शिवाय आणखी काही जागा मविआत मिळतील, असे विधान ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी केले होते.

मुंबई - मविआत राष्ट्रवादी हा मोठा भाऊ असल्याचे विधान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केल्यानंतर आता काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवसेना (ठाकरे गट) हा मविआत  तिसऱ्या क्रमांकाचा  पक्ष आहे, या शब्दांत सोमवारी डिवचले. मोठा कोण यावरून मविआत कलगी-तुरा सुरूच असल्याचे चित्र आहे. एकीकडे महाविकास आघाडीत लोकसभा निवडणुकांसाठी जागा-वाटपावरुन चर्चा सुरू असताना प्रमुख नेत्यांची विधानं चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यातच, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी १९ जागांवर दावा केला आहे. त्यामुळे, महाविकास आघाडीत बिघाडी होईल का, यासंदर्भात अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केली.

शिवसेना गेल्यावेळी जिंकलेल्या १८ जागा लढवेलच शिवाय आणखी काही जागा मविआत मिळतील, असे विधान ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी केले होते. त्यावरून सध्या मविआत नाराजीनाट्य सुरू असल्याची चर्चा होत आहे. तर, तिन्ही पक्षांनी प्रत्येकी १६ जागा लढवाव्यात, असे अद्याप काहीही ठरले नसल्याचेही राऊत यांनी म्हटले. विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला असून १६ जागांचं काहीही ठरलेलं नाही. सध्या केवळ उर्वरीत २५ जागांचा विषय असून २५ जागांच्या वाटपासंदर्भात चर्चा सुरू आहे, असे अजित पवार यांनी म्हटले. 

महाविकास आघाडी लोकसभा निवडणुकीत एकत्रितपणे लढणार का, या प्रश्नावर अजित पवार यांनी स्पष्टच उत्तर दिले. १०० टक्के एकत्र राहणार आहे, तू स्टँप आण, मी लिहून देतो तुला. मी, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले सह्या करुन देतो तुला, असे म्हणत अजित पवार यांनी त्यांच्या स्टाईलने महाविकास आघाडी एकत्रितपणेच निवडणुका लढवणार असल्याचे उत्तर पत्रकाराला दिले. अशा प्रकारच्या चर्चा चालत असतात, एक पक्ष असला तरी एकाच पक्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा विचार करणारे नेते असतात. पण, यासंदर्भात अंतिम निर्णय हा त्या त्या पक्षाचे वरिष्ठ नेते करत असतात.   

दरम्यान, महाविकास आघाडीतील जागावाटप मेरिटनुसार होईल. सर्व बाजूंचा विचार करून जागा वाटप होईल आणि मेरिटवर निर्णय झाला तर अनावश्यक चर्चा थांबेल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी म्हटले होते. प्रत्येक पक्षाने जागांची चाचपणी केली पाहिजे यात काही गैर नाही, असे सांगताना पटोले यांनी प्रदेश काँग्रेसने संभाव्य जागांसाठी समित्या नेमल्याची माहिती दिली. तर, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी कोणत्या पक्षातील कोणती व्यक्ती निवडून येऊ शकते, हा महत्त्वाचा निकष वापरला जाईल. तिन्ही पक्ष चर्चा करून ते ठरवतील, अशी प्रतिक्रिया दिली.

टॅग्स :अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसमहाविकास आघाडीकाँग्रेसशिवसेना