मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर पवार कुटुंबातील दोन दिग्गज नेते एकमेकांचे राजकीय विरोधक बनले आहेत. त्यात, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे आपल्या आजोबांसोबत राहिले असून ते सातत्याने अजित पवार गटातील नेत्यांविरुद्ध आवाज उठवताना दिसून येतात. तसेच, भाजपवर टीका करताना अजित पवार गटातील बड्या नेत्यांवरही ते टीका करतात. अजित पवार यांच्या बारामती दौऱ्यानंतर आणि बीडमधील सभेनंतरही त्यांनी ट्विट करुन टीका केली होती. त्यासंदर्भात, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी रोहित पवारांना बालिश म्हटलं होतं.
रोहित पवार यांनी राष्ट्रवादीतील अजित पवार गटाच्या सभेला प्रतिसाद मिळत नाही, लोकं भाजपच्या नेत्यांबद्दल विधान केल्यानंतर टाळ्या वाजवत नाहीत, असे म्हणत टीका केली होती. या टिकेसंदर्भात आमदार प्रश्न विचारला असता सुनिल तटकरेंनी ही बालिश विधान असल्याचं म्हटलं. ''अजित पवारांना बीड आणि बारामतीमध्ये जो अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला, तो पाहण्यात रोहित पवारांची डोळेझाक झाली असेल. म्हणूनच अशाप्रकारची बालिशपणाची वक्तव्ये त्यांच्याकडून केली जातात,'' असे म्हणत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी रोहित पवारांना टोला लगावला होता. त्यावर, आता रोहित पवार यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे.
मी विचाराला प्रामाणिक राहिलो, माझ्या नेत्याला, माझ्या आजोबाला प्रामाणिक राहिलो आणि कुठेही भूमिका बदलली नाही. माझं स्वच्छ मन आहे, ते मला बालिश म्हटले, ते मी स्वीकारतो. मी लहान आहे, पण हा विचार टिकवण्यासाठी, जगवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. मी एकटा नाही, तुम्ही बालिश फक्त रोहित पवारांना म्हटलेलं नाही, बालिश तुम्ही करोडो लोकांना म्हटलेलं आहे. कारण, करोडो लोकं पवारसाहेबांबरोबर आणि शिव-शाहू-आंबेडकरांच्या विचारांवर चालत आहेत. त्यामुळे, आम्ही सर्वजण बालिश आहोत, आणि बालिश लोकंच येत्या काळात परिवर्तन घडवण्यासाठी कारणीभूत असतील, असे प्रत्युत्तर रोहित पवार यांनी दिले आहे.