“तुम्ही प्रॅापर्टीचे मालक होऊ शकता, पण पक्षाचे-विचारधारेचे कधीच होऊ शकत नाही”
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 10:06 PM2023-02-17T22:06:53+5:302023-02-17T22:08:24+5:30
एकनाथ शिंदेंची घणाघाती टीका.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला धनुष्यबाण आणि पक्षाचं ‘शिवसेना’ हे नाव मिळालं आहे. निवडणूक आयोगानं यासंदर्भातील निर्णय दिला. भारतीय निवडणूक आयोगानं शिवसेनेची सध्याची घटना लोकशाहीविरोधी असल्याचे निरीक्षण नोंदवलं आहे. दरम्यान, तुम्ही प्रॅापर्टी-संपत्तीचे मालक होऊ शकता, पण पक्षाचे-विचारधारेचे मालक कधीच होऊ शकत नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
“सहानुभूती मिळवण्याचा, आपल्या पक्षाकडे असलेले कार्यकर्ते दुसरीकडे जाऊ नये म्हणून केलेला प्रयत्न आहे. निवडणूक आयोग स्वायत्त संस्था आहे. ती स्वतंत्र यंत्रणा आहे. तुम्ही त्यांच्यावर आरोप, आक्षेप करू शकत नाही. तुमच्या अशा वक्तव्यातून लोकशाहीचा खून होतोय, तुम्ही घातक आहात. यापुढे तरी तुमच्यात सुधारणा होऊ द्या,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.
“मगाशी कोणीतरी चोर म्हणालं. म्हणजे आम्ही ५० आमदार, १३ खासदार, शेकडो नगरसेवक, लाखो कार्यकर्ते चोर, इतक्यांना तुम्ही चोर बनवताय आणि तुम्ही एकटे साव. कधी आत्मचिंतन करणार की नाही? हे जेवढे लोक तुम्हाला सोडून गेले ते गुन्हेगार असं कसं होऊ शकतं. तुम्ही सुधारण्याचा प्रयत्न करा, आत्मचिंतन करा असा माझा सल्ला आहे,” असंही ते म्हणाले. “तुम्ही प्रॉपर्टी, संपत्तीचे मालक होऊ शकता, पक्ष आणि विचारधारेचे मालक होऊ शकत नाही. त्यांनी बाळासाहेबांची विचारधारा, भूमिका विकली, चोर तर ते लोक आहेत. त्यांच्या विचारांवर चालले असते तरी त्यांना हक्क होता, पण २०१९ ला तो हक्क गमावला,” असं त्यांनी सांगितलं.
गहाण ठेवलेला धनुष्यबाण सोडवला
“आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या विचारांचा हा विचार आहे. जे कोण आज बोलतायत त्यांनी २०१९ ला बाळासाहेबांचे विचार कोणाच्यातरी दावणीला बांधले. त्यांचे विचार विकण्याचं मोठं पाप केलं. त्यांना ही मोठी चपराक आहे. जेव्हा त्यांच्या बाजूनं निकाल लागतात तेव्हा न्यायव्यवस्था बरोबर असते. जेव्हा विरोधात निर्णय लागतो तेव्हा दबावाखाली निर्णय घेतला, न्यायव्यवस्था विकली गेली असं म्हटलं जातं. ही दुटप्पी भूमिका घेतायत त्यांना त्यांची जागा निकालानं दाखवून दिली. यापुढेही बाळासाहेबांची भूमिका विचार पुढे नेणार आहोत,” असं मुख्यमंत्री म्हणाले. “त्यांनी यापूर्वीच घनुष्यबाण गोठवलं जाईल असं म्हटलं होतं. परंतु २०१९ ला काँग्रेस राष्ट्रवादीकडे जो धनुष्यबाण गहाण ठेवला होता तो मी आता सोडवला आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.