राज चिंचणकर
लोकमत न्यूज नेटवर्क
१४ फेब्रुवारीचा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून साजरा होत असला, तरी या दिवशी वयाची चाळीशी पार केलेल्यांच्या मनावर, ‘ती पाहताच बाला, कलिजा खलास झाला...’ अशा भावनांचे तरंग रुंजी घालतात आणि मधाळ सौंदर्याचा मूर्तिमंत आविष्कार असलेल्या ‘मधुबाला’ची त्यांना या दिवशी हटकून याद येते. ‘प्रेमाचा दिवस’ म्हणून मान्यता पावत चाललेली फेब्रुवारीची १४ तारीख हाच मधुबालाचा जन्मदिवस असावा, याहून अधिक उचित असे व्हॅलेंटाईन गिफ्ट ‘मधु’भक्तांसाठी असूच शकत नाही.
उण्यापुऱ्या ३६ वर्षांच्या आयुष्यात ‘मधुबाला’नामक अप्सरेने तमाम सिनेशौकिनांना पुरते गुलाम केले. पण ही गुलामीदेखील तिच्या चाहत्यांना कायम हवीहवीशी वाटली, यातच तिच्या ‘मधु’रतेचे रहस्य दडले आहे. १४ फेब्रुवारीला तिचे हे गुलाम तिला आवर्जून ‘हॅप्पी बर्थ डे’ करतात आणि आठवणींच्या रुपेरी चांदण्यात ‘मधुबाला’ नावाची चांदणी अलगद शोधू लागतात.
मधुबालाला काळाच्या पडद्यावरून अंतर्धान पावून तब्बल ४९ वर्षे उलटली असली, तरी तिच्या पावलांचा गुंजारव रसिकांच्या कानांत आजही घुमतो. १४ फेब्रुवारीला आम दुनिया संत व्हॅलेंटाईनच्या विश्वात मश्गुल असताना, मधुबालाचे चाहते मात्र तिच्या बेहोष करणाऱ्या नजरेतील चांदण्यात न्हाऊन निघत असतात.
मधुबालाने तिच्या आयुष्यात दुःखाचे असंख्य कडू घोट रिचवले; परंतु रसिकांना मात्र तिने आनंद, गोडवा आणि सौंदर्याचा नजराणा सदैव पेश केला. याची अचूक जाणीव असलेले तिचे भक्तगण, म्हणूनच या दिवशी तिच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतात. १४ फेब्रुवारीला यातली काही मंडळी तिच्या नावाने केक आणतात.
अर्थात, ज्यांच्या हृदयात तिने रुतवलेली प्रीतीची कट्यार कायम आहे; ते तिचे भक्त या केकवरही सुरी चालवू शकत नाहीत ही बाब वेगळी! केकवरच्या मेणबत्तीच्या ज्योतीतही मधुबालाला अजमावणारे, मेणबत्त्या विझवण्याऐवजी त्या नव्याने लावतात. मधुबालाने त्यांच्या हृदयावर घातलेली फुंकर, तिचे भक्त अशी मेणबत्त्यांवर अजिबात वाया जाऊ देत नाहीत.
आज व्हॅलेंटाईन डे साजरी करणारी मंडळी ‘मधुबाला’ नामक चांदण्यात भिजली नव्हती; अन्यथा हा दिवस ‘मधुबाला डे’ म्हणूनच मान्यता पावला असता, यावर ‘मधु’भक्तांची ठाम श्रद्धा आहे. मधुबालाचे सौंदर्य मन:पटलावरून पुसले जाऊ नये म्हणूनच तिची इथली यात्रा केवळ ३६ वर्षांची असावी. तिची सदैव टवटवीत छबीच अंतर्मनावर उमटावी म्हणूनच रुढार्थाने ती लवकर अंतर्धान पावली असावी, याबाबत सर्वांमध्ये अशा वेळी एकमत होते आणि मधुबालाची याद अधिकच गहिरी होत जाते.