रोहित, तू काहीही काळजी करू नकोस... मुख्यमंत्र्यानी 'मेगाभरती'चं स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 10:45 AM2020-03-13T10:45:39+5:302020-03-13T10:46:15+5:30
''राज्यात लवकरच महाभरतीची प्रक्रिया सुरु होणार असून त्याबाबतची तयारीही अंतिम टप्प्यात आली आहे.
मुंबई - राज्यातील रिक्त पदांसाठी मेगा भरतीची तयारी सुरू असून या मेगाभरतीची तारीख निश्चित झाली आहे. 20 एप्रिलपासून राज्य सरकारमधील रिक्त पदांसाठी मेगभारती होणार आहे. त्यासाठी, 1 लाख 6 हजारांची आरक्षण पडताळणीही पूर्ण झाली आहे. मात्र, आमदार रोहित पवार यांनी या मेगाभरतीला आक्षेप घेतला होता. त्यानंतर, रोहित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी, मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना आश्वस्त केले. तसेच यापुढील भरती ऑफलाईन पद्धतीनेच होईल, असेही स्पष्ट केले.
सध्या राज्य सरकारच्या विविध विभागात मिळून साधारण 2 लाख कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. या भरतीला 20 एप्रिलपासून सुरुवात होत आहे. मात्र, आमदार रोहित पवार यांनी या भरती प्रक्रियेला आक्षेप घेतला होता. त्यानंतर, त्यांनी उद्धव ठाकरेंनी भेट घेतली. त्यावेळी, "रोहित याबाबत तू काहीही काळजी करु नको आणि मुलांनाही तसं सांग. यापुढे होणारी भरती प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीनेच होईल'', असे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट शब्दात सांगितले.
''राज्यात लवकरच महाभरतीची प्रक्रिया सुरु होणार असून त्याबाबतची तयारीही अंतिम टप्प्यात आली आहे. पण आधीच्या 'महापोर्टल'च्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या नोकर भरतीचा वाईट अनुभव लक्षात घेता राज्यातील तरुणांचा ऑनलाइन नोकरभरतीला तीव्र विरोध आहे. अनेक तरुणांनी मला, अन्य आमदारांना व नेत्यांना भेटून ऑफलाईन भरती करण्यासाठी सरकारकडे प्रयत्न करण्याची मागणी केली होती. त्यावेळी, मुख्यमंत्र्यांनी ऑफलाईन भरतीचे स्पष्ट केले, असे रोहित पवार यांनी सांगितले.
या निर्णयामुळे अधिकाधिक तरुणांना नोकरभरतीच्या प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. याशिवाय भरती करताना एका दिवशी एकाच पदासाठी संपूर्ण राज्यात परीक्षा घेण्यास सरकार प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच पूर्वी महापोर्टलवर नोंदणी केलेल्या तरुणांनाही या भरतीत प्रक्रियेत सामावून घेण्यात यावं आणि 'महाराष्ट्र लोकसेवा आयोगा'तील सदस्यांच्या रिक्त जागा भरण्यात याव्यात आणि 'एमपीएससी'च्या माध्यमातून जी पदं भरली जातात त्या पदांची रखडलेली भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, अशी मागणीही यावेळी केल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.
राज्यात लवकरच होणाऱ्या नोकरभरतीसंदर्भात काल मुख्यमंत्री श्री. @OfficeofUT साहेबांना भेटलो असता,
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 13, 2020
"रोहित तू काहीही काळजी करु नको आणि मुलांनाही सांग. यापुढील नोकर भरती प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीनेच होईल",
अशा शब्दांत मुख्यमंत्री महोदयांनी आश्वस्त केलं. pic.twitter.com/EO7fz51M25
दरम्यान, महावकास आघाडी सरकारने महापोर्टल बंद करुन एका खासगी एजन्सीमार्फत परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, महाआयटी विभागाच्या माध्यमातून ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. राज्य सरकारच्या निर्देशानुसार 15 एप्रिलपर्यंत राज्यातील शासकीय मेगा भरतीसाठी एजन्सी नियुक्त केली जाईल. महाआयटी विभागाकडून सक्षम अशी खासगी एजन्सी नियुक्त केली जाणार आहे. त्यासाठीही निविदा दोन दिवसात प्रसिद्ध होईल. सामान्य प्रशासन विभागामार्फत एक परिपत्रक प्रसिद्ध केले जाणार आहे. त्यामध्ये, शासकीय भरती कशी राबवायची याबाबतची माहिती असेल, असे महाआयटीचे मुख्य अधिकारी अजित पाटील यांनी सांगितले होते.