‘अभिमन्यू’ चक्रव्यूह में फस गया है तू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:10 AM2021-02-06T04:10:45+5:302021-02-06T04:10:45+5:30
मुरलीधर भवार नाशिकनंतर मनसेसाठी कल्याण, डोंबिवली हीच सुपीक राजकीय भूमी मानली गेली. डोंबिवलीतील मनसैनिक व मतदारांनी मनसेला उभारी दिली. ...
मुरलीधर भवार
नाशिकनंतर मनसेसाठी कल्याण, डोंबिवली हीच सुपीक राजकीय भूमी मानली गेली. डोंबिवलीतील मनसैनिक व मतदारांनी मनसेला उभारी दिली. त्यामुळेच मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हे कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून २०१९च्या निवडणुकीत विजयी झाले. मात्र त्यांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी पक्षातून बाहेर पडत शिवसेनेची कास धरली. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला गळती लागली. त्यामुळे मनसे ढवळून निघाला आणि पक्षबांधणी नव्याने करण्याचे आव्हान पक्षाच्या नेत्यापुढे उभे ठाकले आहे. निवडणूक जाहीर झालेल्या नसताना राजेश कदम व मंदार हळबे यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. प्रत्यक्षात निवडणूक जाहीर झाल्यावर हे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वेळीच मनसेने धोक्याची घंटा ओळखायला हवी.
मनसेची स्थापना २००७ साली झाली. २००८ साली परप्रांतीय विद्यार्थी रेल्वे परीक्षेकरिता आले असता कल्याण व अन्य रेल्वेस्थानकात मनसेने आंदोलन केले. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांना अटक झाली. त्यानंतर त्यांचे कल्याण-डोंबिवलीकडे जास्त लक्ष होते. सातत्याने त्यांचे कल्याण-डोंबिवलीत दौरे होत. त्यातून पक्षाची मोट बांधली गेली. कल्याण-डोंबिवलीत मनसे वाढत गेली.
२००९ साली पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने उभ्या केलेल्या उमेदवाराला एक लाखाच्या आसपास मते मिळाली. मनसेचे मनोबल वाढले. पक्षाला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून २००९ साली विधानसभेच्या निवडणुकीत मनसेने उभे केलेले १३ जण आमदार झाले. त्यापैकी दोन आमदार हे कल्याण ग्रामीण व कल्याण पश्चिमेतील होते. रमेश पाटील हे मनसे आमदार झाले होते. राजू पाटील यांचे ते वडील बंधू होत. रमेश पाटील हे प्रिमिअर कंपनीच्या कामगार संघटनेशी जोडलेले आणि मूळचे काँग्रेसी होते. कॉंग्रेसमध्ये त्यांना आमदारकीची संधी मिळत नसल्याने त्यांनी मनसेची कास धरली. मात्र आमदार झाल्यावरही ते त्यांच्या कामाचा प्रभाव पाडू शकले नाही. त्यामुळे ते दुसऱ्यांदा निवडून आले नाहीत. भाजपची लाट पाहून त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत भाजपची कास धरली. मात्र भाजपमध्ये त्यांचे मन रमले नाही. रमेश यांचे बंधू राजू पाटील यांनी मनसेच्या वतीने निवडणूक लढवून विजयश्री खेचून आणली. पण त्यासाठी मनसे व पाटील बंधूंना पाच वर्षे वाट पाहावी लागली. २००९च्या विधानसभा निवडणुकीतील यशाच्या पार्श्वभूमीवर २०१० साली कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत मनसेचे २८ नगरसेवक निवडून आले होते. एका अपक्ष नगरसेवकाने मनसेला साथ दिल्याने ही संख्या २९ झाली होती. मनसेने जनतेच्या प्रश्नावर व मराठीच्या मुद्द्यावर केलेल्या कल्पक आंदोलनांचे ते फलित होते. त्यावेळी मनसेचा रस्त्यावर उतरून लढणारा चेहरा हा राजेश कदम होता. कदम यांना पक्षाने २००९ साली आमदारकीची उमेदवारी दिली होती. त्यांनी भाजपविरोधात चांगली लढत दिली होती. मात्र त्यांचा पराभव झाला. दुसऱ्या बाजूला महापालिकेच्या सभागृहात नियम, कायद्यांवर बोट ठेवून लढणारे मंदार हळबे हे पक्षाचा सुसंस्कृत चेहरा होते. याचा अर्थ रस्त्यावर व सभागृहात लढणारे दोन्ही चेहरे मनसेने गमावले आहेत. कदम यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर हळबे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशानंतर ते दोघे ज्या मूळ विचारसरणीशी जोडले होते, ज्या पक्षात अगोदर होते त्याच पक्षात पुन्हा गेले, असे वक्तव्य केले गेले. पक्षाला सोडचिठ्ठी देणारे मनसेचे ग्रामीण भागातील पदाधिकारी अर्जुन पाटील हे आमदारांच्या काटई गावातील. त्यांनीही पक्षाला रामराम ठोकला. मनसेला विधानसभा निवडणुकीत कल्याण-डोंबिवलीत यश मिळाले. मात्र पक्षात गटबाजी वाढली. एका गटाला कदम आणि हळबे यांच्याबद्दल ममत्व नव्हते. मनसेत आगरी आणि मराठा असे दोन गट पडल्याचे बोललो जाते. मात्र पक्षाला सोडचिट्टी देणारे अर्जुन पाटील हेही आगरी होते. त्यामुळे गटबाजीबरोबरच मनसेची घसरलेली लोकप्रियता, शिवसेनेची आलेली व टिकलेली सत्ता आणि शिवसेनेची पैशांची ताकद हीदेखील मनसे फुटीची कारणे आहेत. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हे संयमित आणि मनमिळावू नेतृत्व आहे. मात्र राजू पाटील यांची स्वत:ची राजकीय ताकद आहे. ते कुठल्याही पक्षात असले तरी ती कमी होणार नाही. उलट ते ज्या पक्षात असतील त्याला बळ देतील. मनसेचे मागील वेळी निवडून आलेले एकमेव आमदार जुन्नरचे शरद सोनावणे हे मनसेच्या ताकदीवर आमदार झाले होते. त्यामुळे राजू पाटील यांच्याभोवती पक्ष केंद्रिभूत झाला. त्यामुळेही कदाचित गेली १६ वर्षे पक्षासोबत असलेले कदम, हळबे पक्ष सोडून गेले. कल्याण-डोंबिवलीत २००९ साली पक्षाला मिळालेले यश मनसेला टिकवता न येण्याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी सर्वात महत्त्वाचे म्हणजे पक्षनेतृत्वाच्या भूमिकेत सातत्य नसणे. डोंबिवली, कल्याण ही सुशिक्षित मतदारांची शहरे आहेत. कधी नरेंद्र मोदींच्या विकासाचे कोडकौतुक करायचे, तर कधी ‘लाव रे तो व्हिडिओ’द्वारे मोदींवर टीकास्र सोडायचे या राज ठाकरे यांच्या धरसोड वृत्तीमुळे येथील मतदारांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली. डोंबिवली हा रा.स्व. संघाचा बालेकिल्ला आहे. २०१५ सालच्या महापालिका निवडणुकीत भाजपने विकासकामांसाठी साडेसहा हजार कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्या निवडणुकीत शिवसेना व भाजप यांच्यात कलगीतुरा रंगला. त्यामुळे भाजपचा मतदार त्या पक्षामागे एकवटला तर मनसेला मत देऊन मत वाया घालवायचे नाही, असा विचार शिवसेनेच्या मतदारांनी केल्याने मनसेला डावलले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबतच्या राज यांच्या एका वैयक्तिक वक्तव्यानेही मनसेचे नुकसान केले. २००९ साली भाजपचे अवघे नऊ नगरसेवक होते. त्यात लक्षणीय वाढ होऊन २०१५ साली भाजपचे ४२ नगरसेवक निवडून आले. मनसेच्या २९ नगरसेवकांची संख्या घटून मनसेचे नऊ नगरसेवक निवडून आले.
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे आणि भाजपची युती होणार असेल तर त्याची लिटमस टेस्ट ही कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत घेतली जाईल. भाजपने शिवसेनेसारखा मित्र गमावल्याने त्यांची गरज म्हणून भाजप-मनसे युती झाली तरी भाजपचा कट्टर ब्राह्मण मतदार मनसेच्या उमेदवारांना मते देणार का? हा कळीचा मुद्दा आहे. मोदींवर राज यांनी केलेल्या टीकेचा राग तो मनात ठेवणार असेल तर मनसेचा मतदार भाजपच्या उमेदवारांना मते ट्रान्सफर करेल; पण मनसे उमेदवारांना भाजपची मते मिळणार नाहीत. त्यामुळे पुन्हा भाजप काहीअंशी बाळसे धरेल व मनसेची तोळामासा प्रकृती तशीच राहील. अर्थात राज यांच्याकडे फारसे पर्याय नाहीत. महाविकास आघाडीत काँग्रेसची जशी फरफट सुरू आहे तशी भाजपसोबतच्या युतीत मनसेची फरफट होऊ शकते.