तुम्ही आग बघितली, मी अनुभवली आहे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 03:05 AM2018-01-14T03:05:46+5:302018-01-14T03:05:54+5:30

अग्निशमन विभागात मी ३३ वर्षे काम केले आहे. त्यामुळेव मुंबईकर आग पाहतात, पण अग्निशमन विभागात काम करत असल्याने मी अनेकदा ती प्रत्यक्ष अनुभवली आहे. म्हणूनच मला असे तळमळीने सांगावेसे वाटते की, या दुर्घटना रोखण्याची जबाबदारी कोणा एकाची नाही.

You have seen a fire, I have experienced it! | तुम्ही आग बघितली, मी अनुभवली आहे!

तुम्ही आग बघितली, मी अनुभवली आहे!

Next

अग्निशमन विभागात मी ३३ वर्षे काम केले आहे. त्यामुळेव मुंबईकर आग पाहतात, पण अग्निशमन विभागात काम करत असल्याने मी अनेकदा ती प्रत्यक्ष अनुभवली आहे. म्हणूनच मला असे तळमळीने सांगावेसे वाटते की, या दुर्घटना रोखण्याची जबाबदारी कोणा एकाची नाही. सरकार, पालिका प्रशासन, अग्निशमन दल व सामान्य जनता सर्वांनीच आपापली जबाबदारी पार पाडायला हवी. एक जबाबदार नागरिक या नात्याने मी अजूनही अग्निसुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी, यासंदर्भात समाजात जागरूकता आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. म्हणूनच तर जून २०१२ मध्ये मंत्रालयाला लागलेल्या आगीनंतर मी मंत्रालयाचे फुकटात फायर आॅडिट करून द्यायला तयार होतो. कारण जेथे मंत्रालय सुरक्षित नाही तेथे इतर ठिकाणांचे काय? त्यासाठी मी तत्कालीन सरकारला यासंदर्भात मेल केले. पण उत्तर कुणीच दिले नाही. आगीच्या घटना घडतच राहिल्या आणि माझे प्रयत्नही. विद्यमान फडणवीस सरकारने माझ्या मेलला उत्तर दिले. तुमचा मेल नगरविकास विभागाकडे पाठवल्याचे सांगितले. पण त्यालाही आता दोन वर्षे उलटली. त्या विभागाने दखल घेतली नाही. याचाच अर्थ सरकारला काही देणेघेणे नाही. हे झाले सरकारबाबत. आता पालिका प्रशासनाच्या भूमिकेकडे वळूया. नोटीस देण्यापलीकडे ते फारसे काही करत नाहीत. अनेकदा तोडक कारवाई होतच नाही. मुळात अशी बांधकामे होतातच कशी, दबाव आहे असे सांगून आपली जबाबदारी झटकणे कितपत योग्य आहे? थेट कारवाई करणे, फायर सेफ्टी प्लान तयार करून त्याची अंमलबजावणी करणे हे अजून तरी पालिका प्रशासनाला जमलेले नाही. पालिका प्रशासनानंतर क्रमांक लागतो तो अग्निशमन विभागाचा. अपुरे संख्याबळ असतानाही अधिकारी, कर्मचारी जिवावर उदार होऊन लोकांना आगीपासून वाचवतात. पण त्याच्या जोडीलाच ना हरकत प्रमाणपत्र देताना अग्निशमन विभागाने सतर्क राहायला हवे. छोटे वाहनदेखील जाऊ शकणार नाही अशा गल्लीबोळात अग्निशमन दलाच्या गाड्या जाऊ शकतील असे प्रमाणपत्र देण्याआधी त्यामुळे भविष्यात होणाºया दुष्परिणामांचा गांभीर्याने विचार करायला हवा. आता शेवटचा पण या अग्निपरीक्षेतील सर्वात महत्त्वाचा घटक असलेल्या सामान्य मुंबईकरांची मानसिकता जाणून घेऊया. घर घेताना, भाजी घेताना पारखून निरखून घेणारे मुंबईकर अग्निसुरक्षेचा विचार कधीच करताना दिसत नाहीत. हा विचार व्हायलाच हवा. फायर आॅडिट करून घ्यायलाच हवे. ते करून घेताना आॅडिट करणारा खरंच तज्ज्ञ आहे का, याचीही माहिती करून घ्यायला हवी, कारण शेवटी झळा आपल्याला बसणार आहेत. आग लागण्यास आपण कारणीभूत नसलो तरी सुरक्षा आपली धोक्यात येणार आहे. म्हणून अग्निसुरक्षेबाबत जागरूक राहायलाच हवे.

- किरण कदम, निवृत्त मुख्य अग्निशमन अधिकारी, मुंबई

Web Title: You have seen a fire, I have experienced it!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग