आधार अपडेटसाठी चार तास थांबावे लागते रांगेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:06 AM2021-02-07T04:06:42+5:302021-02-07T04:06:42+5:30
आधार अपडेटसाठी चार तास थांबावे लागते रांगेत लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : आधारकार्ड असूनदेखील ते अपडेट नसल्याने नागरिकांना विविध ...
आधार अपडेटसाठी चार तास थांबावे लागते रांगेत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आधारकार्ड असूनदेखील ते अपडेट नसल्याने नागरिकांना विविध ठिकाणी अडचणी येत आहेत. आधारकार्ड अपडेट करून घेण्यासाठी नागरिकांना कित्येक तास रांगेत उभे राहावे लागत आहे. मुंबईत प्रत्येक परिसरात आधार अपडेट केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. तर काहींनी भाडेतत्त्वावर आधार अपडेट केंद्र चालविण्यास घेतले आहे. मात्र या केंद्रांवरदेखील अनेक तांत्रिक अडचणी असल्यामुळे नागरिकांचा आधारकार्ड अपडेट करण्यात वेळ वाया जात आहे.
आधारकार्ड सक्तीचे केल्याने सुरुवातीच्या काळात सर्व नागरिकांनी आधारकार्ड बनवून घेतले. त्यावेळेस अनेकांजवळ मोबाइल नसल्याने आधारकार्डवर केवळ घराचा पत्ता टाकण्यात आला होता. मात्र आता आधारकार्डला मोबाइल क्रमांक व ई-मेल आयडी अशा विविध गोष्टी लिंक करण्यासाठी नागरिकांना आधार अपडेट केंद्र गाठावे लागत आहे. परंतु या केंद्रांवर आधार अपडेट करताना अंगठ्यांचे ठसे डोळ्यांचे फोटो हे जुळवून घेताना मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. अनेक जण के.वाय.सी. अपडेट, घरचा पत्ता व नाव बदलण्यासाठीदेखील आधार अपडेट केंद्रावर येत असतात. मात्र तेथेदेखील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
कोणाचे किती केंद्र
जिल्हा प्रशासन - १०२
केंद्र सरकार - १३३
बँका - ११९
पोस्ट ऑफिस - २३९
का करावे लागते आधार नूतनीकरण
आधारकार्डमध्ये मोबाइल क्रमांक व ईमेल आयडी जोडणे आता अनिवार्य झाले आहे. सुरुवातीला ज्या नागरिकांनी मोबाइल क्रमांक व ई-मेल आयडी आधारकार्डसोबत जोडला नव्हता अशांना आधार अपडेट करावे लागते. तर काही नागरिक घरचा पत्ता व नाव बदलण्यासाठी आधार केंद्रावर येत आहेत.
सागर माने (रांगेतील व्यक्ती) - मी आधार केंद्रावरील रांगेत दोन दिवस अनेक तास उभा आहे. कित्येक वेळेस आधार केंद्रावरील स्कॅनिंग मशीन बंद पडत आहे. तर अनेकदा डोळ्यांचा फोटो व अंगठ्याचा ठसा जुळून येत नाही. सतत असे होत राहिले तर आधार अपडेट कसा होणार? प्रशासनाने ही समस्या सोडवायला हवी.
मानसी खरात (रांगेतील महिला) - घरचा पत्ता बदलण्यासाठी मी आधार केंद्रावर आले. मात्र माझा नंबर येण्यासाठी मला चार तास वाट पाहावी लागली. प्रशासनाने आधार अपडेट करण्याची प्रक्रिया अधिक सोपी करायला हवी. तसेच आधार केंद्रांची संख्यादेखील वाढवायला हवी.