Join us  

'तुम्ही नुसतीच दाढी कुरवाळत बसता', अजित पवारांच्या भाषणात CM शिंदेंही लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 11:06 PM

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून खा. प्रफुल पटेल व खा. सुप्रिया सुळे यांच्यावर पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थितांना संबोधित केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गेल्या २५ वर्षांच्या प्रवासात अनेक चढउतार आपण पाहिले. अनेक जीवाभावाचे सहकारी आपल्याला सोडून गेले. २५ वर्षांनी नवी पिढी पुढे येते. भाकरी फिरवली पाहिजे अशी अपेक्षा केली जात होती. शरद पवार साहेबांनी भाकरी फिरवली, असे म्हणत अजित पवार यांनी पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छाही बोलून दाखवली. तसेच, विरोधी पक्षनेते पदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी मागणीही जाहीरपणे केली.  

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून खा. प्रफुल पटेल व खा. सुप्रिया सुळे यांच्यावर पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. तसेच इतर सदस्यांनाही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या. आता या सगळ्यांनी मिळून पक्ष मजबूत करायचा आहे, असे अजित पवार यांनी म्हटले. यावेळी, अजित पवारांनी राज्य सरकारच्या कारभारावरही टीका केली. राज्यात होत असलेल्या गुन्हेगारी घटनांवर भाष्य करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं. 

महिलांवर अत्याचार, बलात्कार अशा घटना वाढत आहेत. तसेच गुन्हेगारीच्या घटना सातत्याने घडत आहे. हे रोखण्यात सरकार कमी पडते. आपली पोलिस यंत्रणा चांगली आहे. पण त्यांना मोकळीक मिळत नाही. त्यांच्या कामात हस्तक्षेप वाढलेला आहे. सरकार पोलिसांना स्वतःचे कार्यकर्ते असल्यासारखे वागवायला पाहतात. हे सर्व पाहिल्यावर या गोष्टी महाराष्ट्राच्या लौकीकाला शोभा देणाऱ्या नाहीत. त्यामुळे महाराष्ट्राची देशात व राज्यात बदनामी होतेय, असेही अजित पवार यांनी म्हटले.  

मुलींच्या वसतिगृहात मुलीची झालेली हत्या, चालत्या ट्रेनमध्ये मुलीवर झालेल्या अत्याचार, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये प्रियकराने प्रेयसीची केलेली हत्या या घटना पुरोगामी महाराष्ट्राच्या प्रतिमेला छेद देणाऱ्या आहेत. हे सरकार शेतकऱ्यांच्या मालाला भाव देत नाही, बेरोजगारी, महिला अत्याचार याबाबत काहीच बोलायला तयार नाही. याउलट ते आपल्या पक्षाला बदनाम करायचा प्रयत्न करतात. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात तुम्ही माझ्यावर फार टीका करता?, अहो तुम्ही नुसतीच दाढी कुरवळत बसता, मग टीका करू नायतर काय करू, तुम्ही रिझल्ट द्या ना, मग तुमचं कौतुक करेल, असे म्हणत अजित पवार यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली.   

टॅग्स :अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसएकनाथ शिंदेगुन्हेगारी