गौरी टेंबकर - कलगुटकर
'लोकमत' च्या हाती संभाषणाचा ऑडियो'
मुंबई : मालाडच्या राठोडी परिसरात शिधावाटप दुकानातील गैर कारभाराबाबत अनेक तक्रारी येत आहेत. बुधवारी अशाच एका तक्रारदारासोबत रेशन निरीक्षकाने फोनवर अरेरावी करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याचा ऑडियो 'लोकमत' कडे असुन 'इतरांचे राहू द्या, तुम्ही तुमचं बघा, आणि तक्रार मागे घ्या', अशा भाषेत दरडविले जात असल्याने त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
मालाड पश्चिमच्या राठोडी व्हिलेजमध्ये नीलिमा को.ऑप.सोसा.मधील शिधावाटप दुकान क्र.४२ ग १९४ या दुकानात मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याची तक्रार कार्ड धारकांकडून करण्यात येत आहे. याबाबत २२ एप्रिल,२०२० रोजी 'लोकमत' या मध्ये 'राठोडीच्या शिधावाटप दुकानात घोळ' या मथळ्याखाली बातमी प्रसिध्द होताच शिधावाटप निरीक्षक अभिजित बोरोडे याना याबाबत कारवाई करण्यासाठी पाठवी आले. बोरोडे यांनी तक्रार वहीतील एक तक्रारदार सुरेश वाघमारे यांना फोन केला. वाघमारे यांनी १९ एप्रिल, २०२० रोजी रेशन घेण्यास गेलो असता 'रेशन मिळणार नाही,वरून ऑर्डर आहे' अशी सबब दुकानदार वारंवार देत असल्याची तक्रार केली होती. त्यानुसार बोरोडे यांनी वाघमारे यांना फोनवरून त्यांचे गाव विचारले. त्यांनी बुलढाणा असे उत्तर देताच रेशन देण्याचे कबूल केले. मात्र 'माझ्यासोबत विभागात अनेकांची तक्रार आहे, लोक रेशनसाठी हेलपाट्या मारत असल्याचे वाघमारे यांनी बोरोडेना सांगितले. तेव्हा 'इतरांचे राहू द्या, तुमची तक्रार आहे त्यामुळे मी तुम्हाला मदत करतोय, दुकानात जाऊन आंगठा लावत रेशन घ्या आणि वहीतील तक्रारीखाली तारखेसह धान्य मिळल्याचे नमूद करा', असे त्यांना बोरोडे यांनी दरडावत सांगितले. हे सगळे सदर ऑडीओमध्ये रेकॉर्ड झाले आहे. दुकानदारावर कारवाई करायचे सोडून उलट तक्रारदारालाच अरेरावीची भाषा वापरत असल्याने बोरोडेचे दुकानदाराशी त्यांचे काही साटेलोटे आहे का? असा संशय या सगळ्या प्रकारातून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे त्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी कडक कारवाई करत गरिबांना त्यांचे अधिकार मिळवून देण्याची विनंती सामाजीक कार्यकर्ते विनोद घोलप यांनी केली आहे.
-------------------------------------------------
अशा आहेत शिधावाटप दुकान क्र.४२ ग १९४ बाबत तक्रारी ?