तुम्हीही हॉटेलमध्ये कार्डने व्यवहार करत असाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:14 AM2021-02-20T04:14:23+5:302021-02-20T04:14:23+5:30

तर, सावधान..! अवघ्या ५०० रूपयात होते तुमच्या गोपनीय माहितीची विक्री तुम्हीही हॉटेलमध्ये कार्डने व्यवहार करत असाल तर, सावधान..! अवघ्या ...

You may also be dealing with cards in hotels | तुम्हीही हॉटेलमध्ये कार्डने व्यवहार करत असाल

तुम्हीही हॉटेलमध्ये कार्डने व्यवहार करत असाल

Next

तर, सावधान..!

अवघ्या ५०० रूपयात होते तुमच्या गोपनीय माहितीची विक्री

तुम्हीही हॉटेलमध्ये कार्डने व्यवहार करत असाल

तर, सावधान..!

अवघ्या ५०० रुपयांत होते तुमच्या गोपनीय माहितीची विक्री

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : तुम्हीही हॉटेलमध्ये डेबिट, क्रेडिट कार्डने व्यवहार करीत असाल तर सावधान. कारण अशाच हॉटेलमध्ये तुमच्या कार्डचे स्किमिंग होत असल्याची धक्कादायक माहिती गुन्हे शाखेच्या कारवाईत उघडकीस आली आहे. यात हॉटेलचा मॅनेजरच स्किमर मशीनच्या मदतीने ग्राहकांच्या डेबिट, क्रेडिट कार्डची माहिती मिळवून त्याची विक्री करत होता. या प्रकरणी हॉटेल मॅनेजरसह चौघांना अटक करण्यात आली आहे.

गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, एचडीएफसी बँकेचे उपव्यवस्थापक यांच्या तक्रारीनुसार, बँक खातेदारांंनी कुठलीही माहिती शेअर केली नसतानाही नोव्हेंबर २०२० ते जानेवारी २०२१ दरम्यान त्यांच्या खात्यातून पैसे जाण्याच्या तक्रारी वाढल्या. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. त्यानुसार गुन्हे शाखेच्या कक्ष ९ चे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने संबंधित खातेधारकांकडे चौकशी केली. तेव्हा त्यातील कार्डधारकांनी अंधेरी येथील महाकाली केव्हज रोडवरील हॉटेलमध्ये कार्डद्वारे व्यवहार केल्याची माहिती समोर आली. हाच धागा पकडून गुन्हे शाखेच्या कक्ष ९ च्या पथकाने हॉटेलवर छापा मारला.

तेव्हा मालकाकडे केलेल्या चौकशीत अशाच प्रकारे संशयास्पद व्यवहार करणाऱ्या मॅनेजर यशवंत राजेश गुप्ता उर्फ सोनू (२३)ला कामावरून काढल्याचे सांगितले. मात्र तो साथीदारांना भेटण्यासाठी येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून मॅनेजर सोनूसह साथीदार अजहरुद्दीन अन्सारी (२२), इस्तियाक जमाल अहमद खान (२२) यांना बुधवारी अटक केली. अटक आरोपींच्या चौकशीतून यामागील मुख्य सूत्रधार मोहम्मद फैज कमर हुसेन चौधरी (२७) यालाही गुरुवारी अटक करण्यात आली. तो जोगेश्वरीचा रहिवासी आहे. त्यांच्याकडून एक स्किमर, ९ मॅग्नेटिक स्ट्रिप, ७ डेबिट कार्ड, ३ मोबाइल फोन आणि २७ हजार रुपयांची रोकड मिळून आली.

....

अशी करायचे माहितीची चोरी....

जेवणाची ऑर्डर दिल्यानंतर जे ग्राहक डेबिट किंवा क्रेडिट कार्डने व्यवहार करणार असतील त्यांचे कार्ड आधी काउंटरकडे आणून देण्यास मॅनेजर सोनू सांगायचा. त्यानुसार तेथील वेटर कार्ड सोनूकडे आणून देत. त्यानंतर सोनू हा त्याच्या जवळील स्किमर मशीनमध्ये कार्ड स्वॅप करून ती माहिती उतरवून घेत असे. त्यानंतर ते कार्ड आणि स्वॅप मशीन घेऊन ग्राहकाकडे जायचा. ग्राहकाने त्यात पिन टाकताच सोनू तो पिन नोंद करून घेत असे. पुढे व्यवहाराची वेळ आणि त्यापुढे तो पीन क्रमांक लिहून ठेवत असे. पुढे हा सर्व डाटा चौधरीला देत होता. चौधरीनेच त्याला ती स्किमर मशीन दिली होती.

.....

अवघ्या ५०० रूपयात विक्री

सोनूला एका कार्डमागे ५०० रुपये मिळत होते. कार्डची माहिती हातात आल्यानंतर चौधरी बनावट कार्डवर ती उतरवून घेत असे. पुढे त्या बनावट डेबिट कार्डद्वारे पुणे, सातारा येथील एटीएम मधून पैसे काढत होते. तेथील सीसीटीव्ही मध्ये ते पैसे काढताना दिसून आले आहेत. अशात बँक हॉलिडेच्या एक दिवस आधी हे व्यवहार करायचे. जेणेकरून खातेदार पैसे थांबवू शकणार नाही

....

पोलिसांनी केले दुर्लक्ष

संबंधित हॉटेलमध्ये काम करणाऱ्या वेटरने मॅनेजरच्या संशयास्पद वागण्याबाबत मालकाकडे तक्रार केली होती. मालकाने पोलिसांकड़ेही धाव घेतली. त्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचेही समोर आले.

....

चौधरीला ३ वेळा अटक

चौधरी हा सराईत गुन्हेगार असून त्याला ३ वेळा अटक करण्यात आली आहे. मुंबईतील ओशिवरा, खेरवाड़ी पोलीस ठाण्यासह राज्यभरात त्याच्याविरुद्ध गुन्हे नोंद आहेत.

.....

तुमच्याही खात्यातून पैसे गेले का?

तुम्हीही या टोळीच्या जाळयात अडकलात असाल तर तक्रार करण्यासाठी पुढे या असे आवाहनही गुन्हे शाखेने केले आहे.

Web Title: You may also be dealing with cards in hotels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.