अरविंद बापट : कामाच्या आधी पुरेशी विश्रांती, योग्य आहार आवश्यक
नितीन जगताप
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नाेकरी असाे किंवा अन्य काम; प्रवास ठरलेलाच असताे. त्यासाठीचे महत्त्वाचे साधन म्हणजे लाेकल सेवा. प्रत्येकाला त्याच्या इच्छितस्थळी पाेहाेचविण्यासाठी सतत धावणाऱ्या या लाेकलला सुरक्षितपणे नियाेजित स्थळी पाेहाेचविण्याचे काम पश्चिम रेल्वेचे मोटरमन अरविंद बापट यांनी गेली ४३ वर्षे केले. नुकतेच ते सेवानिवृत्त झाले. या चार दशकांच्या सेवेबद्दल त्यांच्याशी साधलेला हा संवाद.
* रेल्वेत नोकरी करण्याची प्रेरणा कशी मिळाली ?
प्रेरणा अशी नव्हती. वडील रेल्वेसेवेत होते. ते डॉक्टर होते. त्यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यावेळी घरात कोणी कमावणारे नव्हते. रेल्वेने मोटरमनची नोकरी कराल का, अशी विचारणा केली. त्यानुसार १९७८ मध्ये नोकरीला लागलो.
* ४३ वर्षांच्या प्रवासात काही अडचणी आल्या का?
अडचणी खूप आल्या. पूर्वी लेव्हल क्रॉस गेट खूप असायचे. वाहने जास्त असतील तर वेळ लागायचा. तोपर्यंत रेल्वेगाड्यांच्या रांगा लागायच्या. त्यामुळे आम्ही नियोजित ठिकाणी उशिरा पोहचायचो. कधी-कधी तर अर्धा तास उशीर होत असे. त्यावर प्रवाशांनी आंदोलने केली. त्यानंतर हे गेट बंद करण्यात आले. तेथे उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत.
* रेल्वे चालविताना तणावमुक्त राहण्यासाठी काय केले?
लाेकल चालवायची म्हणजे तणावमुक्त असणे गरजेचे असते. कामावर जाण्यापूर्वी पुरेशी विश्रांती घ्यायचो. कामाच्या आधी कार्यक्रम, सोहळे टाळायचो. संतुलित आहार, योगासने, ध्यान करीत असे. रेल्वेत नियमितपणे वैद्यकीय चाचणी होते. त्यामध्ये ए १ असायला हवे. वयाच्या ६०व्या वर्षीही ए १ चे निकष कायम असले पाहिजेत. त्यामुळे योग्य ती खबरदारी घ्यावीच लागते.
* एखादा संस्मरणीय प्रसंग आहे का?
भाईंदरला एका महिलेने लहान मुलासोबत रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली. ती घटना मनाला चटका लावून गेली. काहीच करता आले नाही; कारण ती बाई गेटजवळ मुलासोबत लपून बसली होती. गाडी येताच समोर उभी राहिली. आईच्या कृत्यामुळे मुलालाही जीव गमवावा लागला.
मोटरमन होऊ इच्छिणाऱ्यांना काय सल्ला द्याल ?
पूर्वी पदविकाधारक, बी. ई. पदवीधारक घेऊन त्यांना एक ते सव्वा वर्ष प्रशिक्षण दिले जात असे. मात्र, मागील ८ ते १० वर्षांपासून रेल्वेने थेट भरती बंद केली. मालवाहतूक रेल्वे चालविणाऱ्या लोको पायलटला प्राधान्य देऊन त्यांनाच प्रशिक्षण दिले जाते. ते खूप कमी आहे. शिवाय मालवाहतूक गाडी आणि लोकल यांत खूप फरक आहे. त्यामुळे लोको पायलटला जास्त प्रशिक्षण देणे गरजेेचे आहे. कित्येक लोको पायलटचे कुटुंब मुंबईबाहेर असते. त्यांना कुटुंबासाठी वेळ देता येत नाही. रेल्वेने थेट भरती करायला हवी.
.........................