मुंबई: ' तुम्ही १०० नंबर वाले आहे, तुम्हाला मी ओळखत नाही, असे म्हणत लिफ्ट दुरुस्ती वरून झालेल्या वादात एक महिला ही पोलिसाच्या मनगटाला चावल्याचा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी मेधा जाफरी (६०) नामक महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.आरोपी महिला मॉडर्न पार्क, व्ह्यू बिल्डिंग अल्मेडा या परिसरात राहते. पोलीस नियंत्रण कक्षावर २१ ऑक्टोबर रोजी एक फोन आला होता ज्यात एक इसम सीसीटीव्हीचे काम करण्यात अडथळा निर्माण करत असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार वांद्रे पोलीस ठाण्याच्या हवालदार रेखा आव्हाड या त्यांच्या वरिष्ठांसह सदर ठिकाणी पोहोचल्या. तिकडे स्थानिकांकडे विचारणा केल्यानंतर एच/पश्चिम विभाग उपनिबंधक संस्था यांच्या आदेशाने सदर इमारतीमध्ये बंद असलेल्या लिफ्टची दुरुस्ती करण्यासाठी काही अधिकारी व कर्मचारी आल्याचे त्यांना समजले.
मात्र जाफरी ही त्यांना काम करायला देत नव्हती. तेव्हा आव्हाड यांनी याबाबत जाफरीला विचारले. त्यावर तिने हुज्जत घालत त्यांनाच शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आव्हाड यांनी वरिष्ठांना याची माहिती दिल्यावर पोलीस निरीक्षक विशाल पाटील आणि महिला शिपाई निकम या तिथे हजर झाल्या. त्यांनी उपनिबंधकाकडून आलेला आदेशही जाफरी वाचून दाखवत तिची समजूत काढली. मात्र जाफरीने पाटील यांना उद्देशून शंभर नंबर वाल्यांना मी ओळखत नाही असे म्हणत आरडाओरड करून गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यामुळे आव्हाड यांनी सदर महिलेला समजावण्याचा प्रयत्न केल्यावर ती थेट त्यांच्या डाव्या हाताच्या मनगटाला जोरात चावली. इतकेच नव्हे तर त्यांना ढकलून दिल्यावर ती निकम यांनाही शिवीगाळ करू लागली.
या सगळ्या घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले आणि अखेर जाफरीला ताब्यात घेत तिच्या विरोधात गुन्हा दाखल केला गेला. तिला पोलिसांनी नोटीस दिली असून ही महिला सतत गोंधळ घालत असल्याने तिच्या विरोधात नियंत्रण कक्षावरही बऱ्याच तक्रारी येत असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले. आव्हाड यांना भाभा रुग्णालयात उपचार दिल्यानंतर घरी सोडण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.