'तुम्ही रोज तीच कॅसेट वाजवताय', पत्रकाराच्या प्रश्नावर फडणवीस असेही निरुत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 08:20 AM2022-10-04T08:20:20+5:302022-10-04T09:22:48+5:30
वेदांता प्रकल्प गुजरातला गेला. त्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यापेक्षा मोठे प्रकल्प महाराष्ट्राला देऊ असे सांगितले होते.
ठाणे - दसऱ्या मेळाव्या निमित्ताने मुंबईत जी लाखो लोकं येणार आहेत. त्यांपासून कोणतीही अडचण नाही. पण त्या गर्दीचा फायदा घेऊन कोणी चुकीचं काम करू नये. याकरिता आम्ही दक्षता घेऊ असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात केलं. टेंभी नाका येथील देवीच्या दर्शनासाठी तें सोमवारी रात्री सपत्नी ठाण्यात आले होते. त्यावेळी, पत्रकारांशी संवाद साधताना महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आणि लोकांच्या हितासाठी काम करण्याचं बळ मिळू दे, अशी प्रार्थना देवीकडे केल्याचंही ते म्हणाले
वेदांता प्रकल्प गुजरातला गेला. त्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यापेक्षा मोठे प्रकल्प महाराष्ट्राला देऊ असे सांगितले होते. त्यासंदर्भातच नवीन मोठे प्रकल्प कशारितीने येणार आहेत, असा प्रश्न पत्रकारांना फडणवीसांना ठाण्यात विचारला होता. त्यावर, फडणवीसांनी उत्तर देणं टाळल्याचं दिसून आलं. 'अरे जरा कॅसेट पुढे न्या, तुम्ही दररोज तीच कॅसेट वाजवताय, जरा नवीन नाहीये का?' असा प्रतिसवाल फडणवीस यांनी केला. त्यामुळे, वेदांताच्या मुद्द्यावरुन प्रकल्प बाहेर जात असल्याचे विचारले असता फडणवीस हे काहीसे निरुत्तर झाल्याचं दिसून आलं.
#JaiMataDi !
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 3, 2022
Jai Ambe Maa Utsav Mandal, Thane.
ठाण्यातील मानाच्या टेंभीनाका येथील जय अंबे माँ सार्वजनिक उत्सव मंडळाच्या दुर्गेश्वरी देवीची अमृतासह पूजा केली, आशीर्वाद घेतले!
सौ. लताताई शिंदे, आमदार निरंजन डावखरे यावेळी उपस्थित होते.#navratri2022#Maharashtra#Thanepic.twitter.com/YiPSN3SFvR
आपला महाराष्ट्र चिंतामुक्त कर ज्या काही समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी आम्हाला शक्ती दे तुझे आशीर्वाद आमच्या पाठीशी असू दे. असे मागने मी टेंभी नाक्याच्या देवी कडे मागितल्याच त्यांनी सांगितले. तसेच आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी जे शिवसेना -भाजपा युतीचे सरकार स्थापन केले आहे. या सरकारच्या माध्यमातून लोकहिताचे काम करण्यासाठी आईकडे शक्ती मागितली. तर यावेळी त्यांना पत्रकारांनी राज्यातील उद्योगधंदे इतर ठिकाणी जात आहेत. याबाबत विचारले असता रोज तेच तेच काय विचारतात काही तरी नवीन विचारा असे म्हणून त्याला उत्तर देण टाळले.
दसरा मेळाव्यासाठी चोख कायदा व सुव्यवस्था
मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या दुष्टीने आम्ही कायदा सुव्यवस्था चोख ठेवणार आहोत. राज्यातील विविध भागातून येणाऱ्या लोकांपासून काहीच अडचण नसून त्या गर्दीचा फायदा घेऊन कोणी चुकीचं काम करू नये म्हणून आम्ही काळजी घेऊ.असं फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांच्या सोबत पत्नी अमृता फडणवीस हीं होत्या. त्यांचं स्वागत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी वृषाली यांनी केलं.