"तुम्ही राज्य २५ वर्षे चालवा किंवा २७ वर्षे, पण..."; देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

By बाळकृष्ण परब | Published: December 15, 2020 03:24 PM2020-12-15T15:24:48+5:302020-12-15T15:34:17+5:30

Devendra Fadnavis News :

"You run the state for 25 years or 27 years, but ..."; Devendra Fadnavis advice to state government | "तुम्ही राज्य २५ वर्षे चालवा किंवा २७ वर्षे, पण..."; देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

"तुम्ही राज्य २५ वर्षे चालवा किंवा २७ वर्षे, पण..."; देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

Next
ठळक मुद्देतुम्ही हे राज्य २५ वर्षे चालवा किंवा २७ वर्षे चालवा. पण हे कायद्याने चालवाकोरोनाकाळात झालेल्या भ्रष्टाचाराबाबत आम्ही एक पुस्तिकाच प्रकाशित करणार हे कायद्याचं राज्य आहे. सरकारने कायद्यानुसार कारभार केला पाहिजे

मुंबई - विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कोरोनाचा संसर्ग, शेतकऱ्यांचे प्रश्न, मेट्रो कारशेडचा तिढा आणि कंगना व अर्णब गोस्वामींवरून झालेले वाद अशा विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सत्ताधारी महाविकास आघाडीला वारंवार कायद्याच्या राज्याची आठवण करून दिली. तुम्ही हे राज्य २५ वर्षे चालवा किंवा २७ वर्षे चालवा. पण हे कायद्याने चालवा, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला दिला.

विधिळमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या आणि अखेरच्या दिवशी विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सुरुवात करताना देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला घेरण्यास सुरुवात केली. राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला, असा टोला त्यांनी राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीवरून लगावला. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना तीन हजार रुपये मदत करणे हा मुख्यमंत्रिपदाचा अपमान नव्हे का, असे ते म्हणाले.



राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीवर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनाकाळातील राज्य सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. कोरोनाकाळात झालेल्या भ्रष्टाचाराबाबत आम्ही एक पुस्तिकाच प्रकाशित करणार असल्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला. तसेच देशात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. आजही कोरोना उतरणीला लागला असताना सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात होत आहेत, असे सांगत त्यांनी चिंता व्यक्त केली.


यावेळी सध्या गाजत असलेल्या कांजूरमार्गच्या प्रश्नावरूनही फडणवीस यांनी राज्य सरकारची कोंडी केली. कांजूरमार्गचा प्रश्न न्यायप्रविष्ठ नसल्याचे सांगत तांत्रिक मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित करताना कंगना राणावत आणि अर्णब गोस्वामी प्रकरणात राज्य सरकारने घेतलेल्या भूमिकेवर टीका केली. हे कायद्याचं राज्य आहे. सरकारने कायद्यानुसार कारभार केला पाहिजे, असा सल्ला त्यांनी सरकारला दिला. कंगना आणि अर्णब गोस्वामी यांनी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राविषयी केलेल्या विधानाशी आम्ही सहमत नाही. मात्र त्यांच्यावर कारवाई करताना सरकारने कायद्याचा आधार घेतला पाहिजे होता, असा टोलाही त्यांनी लगावला.

हे कायद्याचे राज्य आहे. पाकिस्तान नाही. लोकशाही आहे. तानाशाही नाही. तुम्ही हे राज्य २५ वर्षे चालवा किंवा २७ वर्षे चालवा. पण हे कायद्याने चालवा, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला दिला.

Web Title: "You run the state for 25 years or 27 years, but ..."; Devendra Fadnavis advice to state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.