मुंबई - राज्यातील विधान परिषद निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या निवडणकीत नाशिक मतदारसंघ जास्त चर्चेत राहिला, काँग्रेसच्या सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल करत काँग्रेसलाच धक्का दिला. महाविकास आघाडीने शिवसेनेच्या शुभांगी पाटील यांना उमेदवारी दिली. या मतदारसंघात सत्यजीत तांबे यांनी मोठ्या मताधिक्क्यांनी विजय मिळवला, यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सत्यजीत तांबे यांची बाजू घेत काँग्रेसच्या नेत्यांवर टीका केली तर तांबे यांना सल्लाही दिला. आता, याप्रकणावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपला इशाराच दिला आहे. तसेच, सत्यजित तांबेंबद्दलही स्पष्टीकरण दिले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वक्तव्यावर नाना पटोले यांनी सत्यजित ताबेंबद्दल प्रतिक्रिया दिली. 'राष्ट्रवादीने सत्यजीत तांबे यांना निवडून आणण्यासाठी मदत केल्याचे अजित पवार यांनी वक्तव्य केले. यावरुन राष्ट्रवादीनेही मदत केल्याचा मोठा खुलासा केला आहे, अजित पवार एक जबाबदार व्यक्ती आहेत. तेच असं बोलत असतील तर महाविकास आघाडीची बैठक असेल तेव्हा आम्ही यावर खुलासा करु, अशा शब्दात नाना पटाले यांनी नाराजी व्यक्त केली.
नाशिकमध्ये काँग्रेसचे घर तोडण्याचा जो प्रयत्न झालेला आहे, तो आमच्या जिव्हारी लागला आहे. तुम्ही आमचा एक नेला तर मी पन्नास आमदार निर्माण करेन, अशी आमची रणनीती आहे आणि त्यामध्ये आम्ही नक्कीच यशस्वी होऊ, असा इशाराही नानांनी भाजपा नेत्यांना दिला आहे. तसेच, सत्यजित तांबेबद्दल विचारलेल्या प्रश्नावर बोलणे त्यांनी टाळले. सत्यजित तांबे यांच्यासंदर्भात हाय कमांड निर्णय करेन, असे त्यांनी स्पष्ट केले.
सत्यजित तांबेंना २९ हजार ४६५ इतके मताधिक्य
सत्यजीत तांबे यांना पाचव्या फेरी अखेर 68 हजार 999 मतं मिळाली आहेत. तर शुभांगी पाटील यांना 39 हजार 534 मतं मिळाली आहेत. या चुरशीच्या लढतीत सत्यजित तांबे तब्बल 29 हजार 465 इतक्या मताधिक्याने विजय संपादन केला.