मुंबई - अचानक सत्ता गेल्याने तुम्हाला अंधारी आली आहे, त्यामुळे तुम्हाला आमच्या सरकारची चांगली कामे दिसत नाहीत, असे चिमटे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना काढतानाच, पोटनिवडणूक हरला की भाजप राज्य जिंकतो हा इतिहास आहे, अशी टोलेबाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. तसेच, अजित पवार यांनी सर्वसामान्यांचं सरकार म्हणून शिंदेंवर केलेल्या खोचक टीकेलाही प्रत्युत्तर दिले. मुख्यमंत्री रोड शो करतात हे करायचे असतात का? असे अजित पवार म्हणाले होते.
अजित पवारांनी केलेल्या टीकेवर मुख्यमंत्र्यांनी सभागृहात पलटवार केला. मुख्यमंत्र्यांनी रोड शो केले म्हणता, तुम्हीही गल्लीबोळातून फिरत होतात. माझ्याकडे माहिती आलीय, रात्री तीन वाजताच फोटो आलाय. तर, तुमचे ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेबांनीही १५-२० सभा घेतल्या. छोट्या-छोट्या ग्रुपला बोलावून बैठका घेतल्या. मी तर खुलेआम फिरत होतो, तुम्ही तर गाडी बदलूनही कुठंतरी गेला होतात. रात्री तीन वाजताचा फोटो दाखवलाय, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांवर पलटवार केला.
सर्वसामान्यांनी तुम्हाला हरवलं असे म्हणता, मग पिंपरी चिंचवडमध्ये सर्वसामान्यांनीच तुम्हाला हरवलं हे नाही का दिसलं, असा सवालही मुख्यमंत्री शिंदेंनी केला. तसेच, कसबा पेठ मतदारसंघात केलेल्या चुका आमच्या लक्षात आल्या असून त्या आता पुन्हा होणार नाहीत. कसबा पेठ ही पोटनिवडणूक होती. येथील निकालाने आम्ही सावध झालो आहोत. आता आम्ही कामाने लोकांची मने जिंकू. त्यामुळे कसब्यात पुढे काय निर्णय येईल तो बघा, असेही शिंदे यांनी सांगितले. राज्यपालांच्या अभिभाषणावर दोन दिवसांच्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते.
सार्वत्रिक निवडणुका आम्ही युती म्हणून लढणार आहोत. तुम्ही आघाडीत तीन पक्ष आहात आणि तुम्ही वेगळे लढला होतात. त्यामुळे एक पक्ष निवडणुकीला उभा राहणार आणि दुसरा काय भजन करणार काय? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.
‘अजितदादा, सहशिवसेना पक्षप्रमुख बना...’
अजितदादा हल्ली प्रवक्ते झाल्यासारखेच बोलत आहेत. त्यांना शिवसेनेचे पदच दिले पाहिजे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दादांना सहशिवसेना पक्षप्रमुख बनवा, असा टोला लगावला. त्यावर लगेचच मुख्यमंत्री शिंदे यांनी तसे कसे करता येईल शिवसेना तर आता आपलीच आहे, असे म्हणताच एकच हशा उसळला.