लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील अर्जदारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेमधून महावितरणकडून नवीन घरगुती वीजजोडणी मिळेल.
दि. १४ एप्रिल ते ६ डिसेंबर या कालावधीत ही योजना सुरू करण्यात आली आहे. अर्जदार वीज जोडणीसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करू शकतात. वीजजोडणी घेण्यासाठी ५०० रुपये अनामत रक्कम भरावी लागेल. ती पाच समान मासिक हप्त्यांमध्येच वीजबिलातून भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. वीजजोडणीचा अर्ज मंजूर झाल्यानंतर वीज पायाभूत सुविधा उपलब्ध असल्यास १५ दिवसांमध्ये जोडणी कार्यान्वित होईल. ज्याठिकाणी वीज जोडणीसाठी सुविधा तयार करावी लागणार आहे, अशाठिकाणी महावितरणकडून उपलब्ध होऊ शकणाऱ्या निधीमधून सुविधा उपलब्ध करण्यात येईल.
अर्जदारांनी वीज जोडणीसाठी सक्षम प्राधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र, वीजजोडणीच्या विहीत नमुन्यातील अर्जासोबत आधारकार्ड, रहिवासी कार्ड जोडावे. वीज जोडणीसाठी अर्ज केल्याच्या ठिकाणी वीजबिलाची पूर्वीची थकबाकी नसावी तसेच शासनमान्य विद्युत कंत्राटदाराकडून वीजसंच मांडणीचा चाचणी अहवाल अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
................................