लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दहा रुपयांत थाळी देण्यात येईल, असे आश्वासन विधानसभा निवडणुकीदरम्यान शिवसेनेने दिले होते. शिवसेनेने या आश्वासनाची पूर्ती गुरुवारी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातून केली. दरम्यान, महापालिकेने १० रुपयांत थाळी सुरू केली असली तरी ती केवळ महापालिका कर्मचारी वर्गापुरतीच मर्यादित आहे. उर्वरितांना मात्र पालिकेच्या उपाहारगृहातून ठरविलेल्या किमतीमध्येच थाळी घ्यावी लागेल.महापालिकेच्या उपाहारगृहात गुरुवारी दुपारी दीड वाजता १० रुपयांत थाळी देण्याच्या योजनेचा महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या योजनेमुळे पालिकेच्या कर्मचारी वर्गास तरी १० रुपयांत जेवण मिळणार आहे. दुसरीकडे ठिकठिकाणी १० रुपयांत थाळी देण्याच्या योजनांना वेग आला आहे. काही दिवसांपासून मुंबईच्या डबेवाल्यांनीही उपनगरात १० रुपयांत थाळी देण्याच्या योजनेचा शुभारंभ केला होता.१० रुपयांत मिळणारी थाळी सर्वांना मिळणार, असा सर्वसामान्य नागरिकांचा समज होता. त्यामुळे कमी पैशांत पोटभर जेवायला मिळेल असे हातावर पोट घेऊन दररोज काम करणाऱ्यांना वाटत होते. मात्र हा भ्रम असल्याची चर्चा आता सामान्यांमध्ये रंगू लागली आहे. तसेच हा उपक्रम सर्वसामान्यांसाठी सर्वत्र सुरू करावा, अशी मागणीही होत आहे.
१० रुपयांत थाळी मिळणार; पण पालिका उपाहारगृहातच
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 6:13 AM