पंचतारांकित हॉटेलमधून बसून जनतेची नाळ समजणार नाही; आशिष शेलार यांचा राज ठाकरे यांना टोला
By मनोहर कुंभेजकर | Updated: January 31, 2025 22:42 IST2025-01-31T22:40:04+5:302025-01-31T22:42:38+5:30
कांदिवली पश्चिम येथील रघुलीला मॉल मध्ये झालेल्या उत्तर मुंबईच्या भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

पंचतारांकित हॉटेलमधून बसून जनतेची नाळ समजणार नाही; आशिष शेलार यांचा राज ठाकरे यांना टोला
मनोहर कुंभेजकर, मुंबई : उपनगर पालक मंत्री अँड.आशिष शेलार यांनी खोटे नरेटीव्ह पसरवणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा जोरदार समाचार घेतला.काल वरळी डोम मध्ये झालेल्या मनसेच्या राज्यस्तरीय मेळाव्यात विधानसभा निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच इतका सन्नाटा पसरला असे वक्तव्य त्यांनी केले होते,त्याला शेलार यांनी प्रति उत्तर दिले.आमचा कार्यकर्ता फिरतो,तुमचा कार्यकर्ता किती फिरतो ते सांगा.पंचतारांकित हॉटेल मधून बसून तुम्हाला जनतेची नाळ समजणार नाही. सन्नाटा हा तर कृष्णकुंज मध्ये पसरला असल्याचा टोला त्यांनी लगावला.
कांदिवली पश्चिम येथील रघुलीला मॉल मध्ये झालेल्या उत्तर मुंबईच्या भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.तडजोडीचे राजकारण आणि ,विचारांना बगल कधीच भाजपाने केली नाही.तर अयोध्या राम मंदिर ,३७० कलम प्रकरणी कधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तडजोड केली नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. त्याआधी ज्येष्ठ भाजप नेते वेदप्रकाश गोयल यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त केंद्रीय वाणिज्य मंत्री आणि उत्तर मुंबईचे खासदार पियुष गोयल यांच्या कांदिवली पश्चिम येथील लोककल्याण कार्यालयाचे उद्घाटन आज सायंकाळी झाले.
यावेळी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री अँड. आशिष शेलार, सह पालक मंत्री मंगल प्रभात लोढा,उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक,माजी खासदार गोपाळ शेट्टी आमदार प्रकाश सुर्वे, आमदार योगेश सागर, आमदार मनिषा चौधरी,विधानपरिषदेचे भाजप गटनेते प्रवीण दरेकर,माजी आमदार भाई गिरकर, उत्तर मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष गणेश खणकर आणि इतर अन्य मान्यवर उपस्थित होते.
या मेळाव्यात उद्धव सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा देखिल मंत्री शेलार यांनी जोरदार समाचार घेतला.सध्या भाजप सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे.उत्तर मुंबईत ५ लाख आणि मुंबईत १० लाख भाजप सदस्य नोंदणी करून खोटे नरेटीव्ह पसरवणाऱ्यांना चोख उत्तर द्या असे त्यांनी भाजप कार्यकर्त्याना आवाहन केले.लोकशाही मूल्यावर चालणारी पार्टी भाजप, संविधान चालणारी पार्टी भाजपा असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.यावेळी वेदप्रकाश गोयल यांच्या आठवणींना उजाळा देत १९९५ साली मुंबई भाजप युवा मोर्चाच्या सचिवपदी त्यांनी आपली राजकारणातली पहिली नियुक्ती केल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणाले की, हे कार्यालय जनतेसाठी समर्पित असून, नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी, विविध कल्याणकारी योजना राबवण्यासाठी आणि उत्तर मुंबईच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. आपले वडील वेदप्रकाश गोयल यांचे, प्रेरणादायी कार्य हीच आपल्या सार्वजनिक जीवनातील वाटचाल सुरू होण्यामागील मुख्य प्रेरणा असल्याचे त्यांनी नमूद केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळात ११ वर्षे काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच, त्यांचे भारतीय जनता पक्षाशी बालपणापासून असलेले दृढ नाते त्यांनी अधोरेखित केले.