Join us

पबजीत १० लाख गमावल्याने घर सोडून पळाला मुलगा; एमआयडीसी पोलिसांनी शोधले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 11:29 PM

पबजी खेळण्याच्या नादात ऑनलाइन व्यवहारातून अल्पवयीन मुलाने १० लाख गमावले.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई: पबजी खेळण्याच्या नादात ऑनलाइन व्यवहारातून अल्पवयीन मुलाने १० लाख गमावले. याबाबत पालक रागावले म्हणून तो घर सोडून पळाला. मात्र एमआयडीसी पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला समजावून पुन्हा पालकांच्या ताब्यात दिले आणि त्यांचा जीव भांड्यात पडला.

जोगेश्वरीत बुधवारी हा प्रकार घडला. सदर मुलगा हा १६ वर्षांचा असून त्याला पबजी खेळण्याचे व्यसन लागले होते. त्यात त्याने १० लाख गमावले. ही बाब पालकांच्या लक्षात आल्यावर ते त्याच्यावर रागावले. त्यामुळे रागात मुलाने घरातून पळ काढला. त्याच्या वडिलांनी याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र मुलगा अल्पवयीन असल्याने पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला. तपासादरम्यान, मुलाच्या पालकांनी पोलिसांना त्याच्या पबजी खेळाच्या व्यसनाबाबत सांगितले. तेव्हा खबरी आणि तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने गुन्हे शाखेने मुलाला शोधले. जो अंधेरी परिसरात सापडला. त्याला समुपदेशनानंतर त्याच्या पालकांकडे परत पाठवण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. 

टॅग्स :पबजी गेममुंबईगुन्हेगारी