मुंबई : मोबाईल चोरीचे प्रमाण शहरात वाढीस लागले असून चोरी करण्यासाठी गुन्हेगार कोणाच्याही जिवाची पर्वा करत नसल्याचे वाकोल्यात घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे उघडकीस आले आहे. यात मुलांना शाळेत सोडून परतणाऱ्या महिलेच्या हातावर ब्लेड मारून तिचा मोबाइल हिसकावण्यात आला. या हल्ल्याप्रकरणी रितिका कसबे (२१) नामक तरुणीला वाकोला पोलिसांच्या ताब्यात दिले.
तक्रारदार स्वाती मरगच (३१) या वाकोल्यातील डिमेलो कंपाउंडमध्ये राहतात. २५ जुलै रोजी दुपारी सव्वाच्या सुमारास त्या मुलगा यश आणि मुलगी समृद्धी यांना शाळेत सोडून घराच्या दिशेने पायी जात होत्या. त्यांच्या एका हातात छत्री तर उजव्या हातात मोबाइल होता. चालत चालत त्या लाल मैदान परिसरात पोहोचल्या आणि तितक्यात त्यांच्या उजव्या हातावर ब्लेड मारत कोणीतरी त्यांचा मोबाइल खेचला. हात रक्तबंबाळ झाल्याने त्यांनी मागे वळून पाहिले तेव्हा एक २० ते २५ वयाची एक तरुणी त्यांचा मोबाइल खेचून घेतल्यानंतर पळून जात होती. हाताला जखम होऊनही स्वाती यांनी जोरजोरात आरडाओरड करण्यास सुरुवात केली तेव्हा इतर महिलांनी पळून जाणाऱ्या स्त्रीला पकडले.
आरोपी कसबे ही वाकोला परिसरातच राहत असून महिला पोलिसांनी महिला कक्षामध्ये नेत तिची अंगझडती घेतली तेव्हा स्वातीचा फोन तिच्याकडे सापडला. इतकेच नव्हे तर तिने ओढणीला ब्लेड बांधल्याचेही पोलिसांनी पाहिले.
या प्रकरणी स्वातीने तक्रार दिल्यावर कसबेच्या विरोधात वाकोला पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ३९२ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून तिला ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान. स्वाती यांच्यावर उपचार करण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे.