अल्पवयीन मुलींनी नोकरीच्या शोधात बंगळुरू सोडले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 01:39 AM2020-02-17T01:39:17+5:302020-02-17T01:39:48+5:30
रिक्षाचालकाने सुखरूप पालकांकडे पाठविले
मुंबई : वर्तमानपत्रातील जाहिरात पाहून बंगळुरू येथील दोन अल्पवयीन मुलींनी नोकरीसाठी मुंबई गाठली. ज्या ठिकाणी नोकरीसाठी गेल्या तो मोबाइल क्रमांक बंद होता. पण रिक्षाचालकाने त्यांना मदत करत सुखरूप पालकांकडे पाठविले. मुलींच्या पालकांनी त्या रिक्षाचालकाचे आभार मानले आहेत.
याबाबत रिक्षाचालक सोनू यादव यांनी सांगितले, मंगळवारी दुपारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे प्रीपेड रिक्षा स्टॅण्डवर दोन अल्पवयीन मुली आल्या होत्या. नोकरीच्या मुलाखतीसाठी लोखंडवाला कॉम्प्लेक्स अंधेरी येथे जायचे आहे, असे त्यांनी सांगितले. परंतु त्यांच्याकडे रिक्षाचे भाडे देण्यास पैसे नव्हते. त्यांना लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथे नेले. त्यांनी वर्तमानपत्रातील जाहिरातीमधील क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तो क्रमांक बंद होता. त्यांनी इमारतीजवळ असलेल्या सुरक्षारक्षकाला नोकरीसाठी विचारपूस केली. त्या वेळी सुरक्षारक्षकाने त्यांच्याकडे आधारकार्ड आणि बायोडेटाची मागणी केली. त्यावर त्या मुलींनी आपल्याकडे नसल्याचे सांगितले. त्यांच्याकडे घरचा मोबाइल क्रमांक मागितला, पण मुलींनी रडण्यास सुरुवात केली. त्यांची विचारपूस केली असता त्यांनी घरी न सांगता नोकरीसाठी पळून आल्याचे सांगितले. त्यानंतर रिक्षाचालकांनी मिळून रेल्वेचे तिकीट काढून त्या मुलींना रेल्वेत बसवून दिले. त्या मुली पोहोचल्यानंतर पालकांनी आभार मानले तसेच बक्षीस म्हणून दहा हजार रुपये देऊ केले, पण यादव यांनी ते नम्रपणे नाकारले.