लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महिलेचे अश्लील फोटो सोशल मीडियावरून व्हायरल करणाऱ्या नांदेडमधील तरुणाला विनोबा भावे नगर पोलिसांनी अटक केली.
अनिल नारायण पात्रोड (वय २६, रा. समता नगर, हनुमान मंदिराच्या बाजूला, विद्याविकास कॉलेजजवळ, धर्माबाद, नांदेड) असे अटक केलेल्याचे नाव असून, तो पोलिसांपासून वाचण्यासाठी राज्यासह तेलंगणा राज्यात अनेक ठिकाणी लपून राहत होता. मात्र, निरीक्षक पाटील, उपनिरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या पथकाने तांत्रिक कौशल्याचा वापर करत त्याला अटक केली.
कुर्ला पश्चिमेत राहणाऱ्या एका ३९ वर्षांच्या विवाहित महिलेचे व तिच्या नातेवाईकांचे फोटो मिळवून अनिल पात्रोडने तिच्या फेसबुकवर डाऊनलोड केले. महिलेने अकाऊंट बंद केल्यानंतरही तो तिच्या मित्राच्या इन्स्टाग्राम व अन्य फेसबुक अकाऊंटवर टॅग करत राहिला. अखेर त्याबाबत विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात २ जून रोजी माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासादरम्यान निष्पन्न झाले की, संबंधित आरोपी हा तेलंगणासह महाराष्ट्रभर फिरत असून, त्याचे स्थान स्थिर नव्हते. दरम्यान, तो कल्याण रेल्वे स्थानक परिसरात आल्याचे मोबाइल लोकेशनवरून स्पष्ट झाल्यानंतर उपनिरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी सहकाऱ्यांसमवेत सोमवारी रात्री त्याला अटक केली. अनिल पात्रोड हा आचाऱ्याचे काम करत होता, त्याच्याकडील मोबाइल जप्त करण्यात आले असून, त्याच्याकडे अधिक तपास सुरू असल्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेश पवार यांनी सांगितले.
...............................................