कार विक्रीच्या नावाखाली तरुणाची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:11 AM2021-02-20T04:11:27+5:302021-02-20T04:11:27+5:30
मुंबई : कार विक्रीच्या नावाखाली तरुणाची फसवणूक केल्याप्रकरणी चेंबूर पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात एक ...
मुंबई : कार विक्रीच्या नावाखाली तरुणाची फसवणूक केल्याप्रकरणी चेंबूर पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात एक लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
तक्रारदार कुर्ला परिसरात राहण्यास आहेत. मे २०१९ मध्ये ओएलएक्सवर कार विक्रीसाठी उपलब्ध असल्याची जाहिरात पाहिली. जाहिरातीत दिलेल्या मोबाईल नंबरवर त्यांनी संपर्क साधला. समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने आपले नाव कमलेश जाधव असल्याचे सांगत सायन-ट्राॅम्बे रोड येथे वसीम कुरेशी यांचा बँकेकडुन लिलाव केलेल्या जुन्या गाड्या विकण्याचा व्यवसाय असून, कार विकत असल्यास कार्यालयात येऊन भेटण्यास सांगितले. प्रजापती हे त्यांच्या एका मित्रासोबत या कार्यालयात गेले असता तेथे जाधव त्यांना भेटला. त्याने कार्यालयाबाहेर उभी केलेली कार विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले. प्रजापती आणि त्यांच्या मित्राला ही कार आवडताच जाधव याने गाडीची किंमत तीन लाख रुपये सांगितली. चर्चा होऊन गाडीची विक्री किंमत दोन लाख ७० हजार रुपये ठरली. प्रजापती यांनी गाडी विकत घेण्याचे ठरवले. ठरल्याप्रमाणे सुरुवातीला एक लाख रुपये दिले. मात्र, गाड़ी दिली नाही. बरेच दिवस उलटल्याने त्यांनी पैसे परत देण्याचा तगादा लावला. मात्र, पैसे न मिळाल्याने अखेर त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंद करत अधिक तपास सुरू केला आहे.