दांडिया खेळताना तरुणाचा हृदयविकाराने झाला मृत्यू; मुलुंड येथील दुर्दैवी घटनेबद्दल हळहळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2022 06:31 AM2022-10-03T06:31:07+5:302022-10-03T06:31:40+5:30
मुलुंड येथे गरबा खेळण्यासाठी गेलेल्या डोंबिवलीकर तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुलुंड येथे गरबा खेळण्यासाठी गेलेल्या ऋषभ भानुशाली या २७ वर्षीय डोंबिवलीकर तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
डोंबिवलीतील जुन्या डॉन बॉस्को शाळेमागील त्रिमूर्ती अपार्टमेंटमध्ये ऋषभ आई-वडिलांबरोबर रहात होता. त्याच्या मोठ्या बहिणीचा विवाह झाला आहे. एमबीए झालेला ऋषभ नुकताच बोरीवलीतील एका खासगी कंपनीत मॅनेजरपदावर नोकरीला लागला होता. घरातील एकुलता एक मुलगा गमावल्याने कुटुंबीयांना धक्का बसला आहे. शनिवारी ऋषभ कुटुंबीयांसोबत मुलुंडचे भाजप खासदार मनोज कोटक यांच्यातर्फे कालिदास नाट्यगृह येथे आयोजित प्रेरणा रास दांडिया खेळण्यासाठी आला होता.
दांडिया खेळत असताना अचानक त्याच्या छातीत दुखू लागल्याने कुटुंबीयांनी ॲसिडिटी झाल्याचे समजून थंड पेय दिले. मात्र जास्त त्रास जाणवल्याने तत्काळ रुग्णवाहिकेतून जवळच्या खासगी रुग्णालयात नेले. तेथे दाखल करण्यापूर्वीच त्याला मृत घोषित केल्याने कुटुंबीयांना धक्का बसला. हृदयविकारामुळे ऋषभचा मृत्यू झाल्याचे मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांतिलाल कोथिंबिरे यांनी सांगितले.
गेल्या काही महिन्यांत तरुणांमध्ये हृदयविकाराच्या तक्रारींत मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येत आहे. काही तरुणांचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. तणाव, व्यसनाधीनता आणि पुरेशी झोप न घेणे ही अनेकदा कारणे असतात. त्यामुळे तरुणांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. व्यायाम शाळेत जायला जमले नाही तर रोज किमान अर्धा तास चालले पाहिजे. - डॉ. हरेश मेहता, हृदयविकार तज्ज्ञ
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"