‘तौत्के’ चक्रीवादळात मर्चंट नेव्हीत कार्यरत दोंडाईचा येथील युवकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 11:19 PM2021-05-21T23:19:26+5:302021-05-21T23:21:15+5:30
अरबी समुद्रात आलेल्या ‘तौक्ते’चक्रीवादळात मर्चंट नेव्हीचे जहाज समुद्रात बुडाले. या जहाजावर कार्यरत असलेल्या दोंडाईचा येथील युवकाचा मृत्यू झाला.
अरबी समुद्रात आलेल्या ‘तौक्ते’चक्रीवादळात मर्चंट नेव्हीचे जहाज समुद्रात बुडाले. या जहाजावर कार्यरत असलेल्या दोंडाईचा येथील युवकाचा मृत्यू झाला. शनिवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. योगेश प्रकाशगीर गोसावी (३४) असे मयताचे नाव आहे.
दोंडाईचा येथील सेवा निवृत्त शिक्षक प्रकाशगिर गिरीधर गोसावी यांचा एकुलता मुलगा योगेश प्रकाशगिर गोसावी हा मुंबईला मर्चंट नेव्हीत कार्यरत होता.सुमारे तीन वर्षांपासून मर्चंट नेव्हीचा जहाजावर ’फायर अँड सेफ्टी’ पदावर कार्यरत होता.दीड वर्षापूर्वीच त्याचा विवाह झाला होता.
मंगळवारी अरबी समुद्रात ‘तौक्ते’चक्रीवाद घोगावणार असल्याचा सूचना शासनाने व हवामान खात्याने दिल्या होत्या. असे असतांनाही मर्चंट नेव्ही प्रशासनाने जहाज समुद्रात पाठवले.या जहाजावर कर्तव्य बजावत असतांना जहाज समुद्रात बुडाले. त्यात योगेश प्रकाशगिर गोसावी ( वय ३४) यांचाही बुडून मृत्यू झाला. मुंबईला असलेले त्यांचे मामा यांनी मृतांची ओळख पटविली आहे.दरम्यान त्याचे शव ताब्यात घेतले असून ते शनिवारी सकाळी दोडाईचात आणून अंत्यसंस्कार केले जातील.दरम्यान कंपनीच्या हलगर्जीपणामुळे योगेशचा मृत्यू झाला असून त्याची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वडील प्रकाशगिर गोसावी व त्याचा नातेवाईकानी केली आहे.
त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी,दोन बहिणी असा परिवार आहे.