मीरारोड - उत्तनच्या दीपस्तंभ मागील समुद्रात मासेमारीसाठी गेलेला १९ वर्षीय मच्छीमार बुडल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. पातान बंदर येथे राहणारे ऑज्वेल नेतोघर हे १९ वर्षीय मुलगा प्रतीक सह दीपस्तंभ मागील समुद्रात डायन बंदर भागात मासेमारीसाठी शुक्रवारी पहाटे साडे चारच्या सुमारास गेले होते.
जाळे टाकून मासे पकडत असताना प्रतीक हा पाण्यात बुडू लागला. त्याला पोहता येत नव्हते. यावेळी समुद्रातील पाण्याचा प्रवाह वाढल्याने तो मदतीसाठी ओरडू लागला. त्याचे वडील त्याला वाचवण्यास गेले पण प्रतीक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. आजूबाजूच्या मच्छीमारांना सदर प्रकार कळताच त्यांनी सुद्धा प्रतिकचा शोध घ्यायला सुरुवात केली. पालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान सुद्धा घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सुद्धा शोध घेतला पण प्रतीक सापडला नाही.