Dadar Railway Station: मुंबईतील दादर रेल्वे टर्मिनलवर आलेल्या एक्स्प्रेसमध्ये एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ट्रेनमध्येच आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली होती. एक्स्प्रेस दादर टर्मिनलवर आल्यानंतर रेल्वे पोलिसांनी ट्रेनची तपासणी करत असताना ही बाब उघडकीस आली. रेल्वेच्या एका डब्याचे बाथरूम आतून बंद होते. रेल्वे पोलिसांना आतमध्ये कोणीतरी असल्याचे वाटल्याने त्यांनी दरवाजा वाजवण्यास सुरुवात केली. मात्र आतल्या व्यक्तीकडून प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी दरवाजा उघडला तेव्हा आतमध्ये मृतदेह आढळून आला.
बुधवारी सकाळी दादर स्थानकात आलेल्या रणकपूर एक्स्प्रेस ट्रेनमध्ये हा सगळा प्रकार घडला. तपासणीदरम्यान रेल्वे पोलिसांना एका बोगीमधील टॉयलेटचा दरवाजा बंद असल्याचा आढळले. बराच वेळ दरवाजा उघडला न गेल्याने पोलिसांना संशय आला. शेवटी पोलिसांनी टॉयलेटचा दरवाजा उघडला. यानंतर टॉयलेटमध्ये एक व्यक्ती टॉवेलला लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. महत्त्वाचे म्हणजे आत्महत्या केलेल्या व्यक्तीकडे कोणतेही ओळखपत्र किंवा मोबाईल फोन सापडला नाही. या प्रकरणी मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रेल्वे पोलीस मृतांची आणि त्यांच्या नातेवाईकांची ओळख पटवण्याचे काम करत आहेत.
"प्राथमिकदृष्ट्या कोणताही घातपात असल्याचा संशय नाही आणि हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे दिसत आहे. शवविच्छेदन तपासणीतही हा आत्महत्येचाच प्रकार असल्याचे दिसून आले आहे," अशी माहिती मुंबई सेंट्रल जीआरपीचे वरिष्ठ निरीक्षक हेमराज कुंभार यांनी दिली.
दरम्यान, त्याआधी वांद्रे रेल्वे पोलिसांनी मुंबईहून गुजरातला जाणाऱ्या कच्छ एक्स्प्रेसमधील एका महिला प्रवाशाचा विनयभंग केल्याप्रकरणी कोच अटेंडंटला अटक केली होती. हरिओम विश्राम मीना असे आरोपी अटेंडंटचे नाव आहे. आरोपी कच्छ एक्सप्रेसच्या एसी कोचमध्ये अटेंडंट म्हणून तैनात होता. दरम्यान, वांद्रे येथून ट्रेन सुटली असता त्याने एका महिला प्रवाशाचा विनयभंग केला. त्यानंतर तक्रार आल्यानंतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.