गुन्हा दाखल : पिन बदली करून देण्याच्या बहाण्याने कार्डची अदलाबदल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एटीएम सेंटरमध्ये पिन बदली करून देण्याच्या बहाण्याने एटीएम कार्डची अदलाबदल करून ठगाने ९४ हजार ६२८ रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार कुर्ला येथे उघडकीस आला. याप्रकरणी कुर्ला पोलिसांनी अनोळखी आरोपीविरुद्ध शुक्रवारी गुन्हा नोंद केला.
कुर्ला परिसरात राहणारा अर्षद अली नवाब अली खान (वय २२) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. १९ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता एटीएम कार्ड ब्लॉक झाल्याने कार्ड पुन्हा सुरू करण्यासाठी ताे जवळच्या एटीएम सेंटरमध्ये गेला. तेथे पिन क्रमांक बदलत असताना एकदा चूक झाल्याने पिन बदलला गेला नाही. दरम्यान, तेथे आलेल्या एका तरुणाने पिन बदली करून देण्यास मदत करतो असे सांगून त्याचे कार्ड स्वतःकडे घेतले. पिन बदली केल्यानंतर, तेथे अन्य व्यक्ती पैसे काढण्यासाठी आल्याने ठगाने खानला थोडा वेळ बाहेर थांबू असे सांगितले. पुढे एटीएम पिन बदली झाल्याचे सांगून ते खानच्या हातात देऊन ताे निघून गेला.
पैसे काढायचे नसल्याने ते कार्ड तसेच पाकिटात ठेवून खान घरी आला. त्यानंतर २१ जानेवारीला सायंकाळी ७ वाजता एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेला, तेव्हा जवळ असलेल्या एटीएम कार्डवर प्रणित पाटीलचे नाव असल्याचे दिसले. तेव्हा पिन क्रमांक बदली करून देण्यास मदत करणाऱ्या ठगाने कार्ड बदली केल्याचे लक्षात आले. यात, ठगाने ९४ हजार ६२८ रुपये काढल्याचे समजताच त्याला धक्का बसला. हे कार्ड त्याच्या भावाच्या नावावर होते. कामानिमित्त भाऊ सौदी अरेबियाला असून, त्याच्याच रोजगारावर कुटुंबीयांचा उदरनिर्वाह सुरू आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्याने कुर्ला पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार कुर्ला पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंद करून अधिक तपास सुरू केला आहे.
............................