तरुणाने घरीच साकारली शाडूची 'बाल गणेश' मूर्ती, दर्शनासाठी नेत्यांची रांग लागली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 11:42 AM2021-09-17T11:42:28+5:302021-09-17T11:44:31+5:30
सुनील थळे (गोरेगाव फिल्मसिटी) हे चित्रपट क्षेत्रात गेली 20 वर्षे काम करीत असून त्याने आजपर्यंत मराठी हिंदी असे अनेक चित्रपटांचे कला दिग्दर्शन केले आहे.
मुंबई - वडिलांचे गुण मुलांमध्ये येतात असे नेहमी म्हंटले जाते. न्यू दिंडोशी म्हाडा कॉलनी, फ्लॅट नं.401 बिल्डिंग नं.2/ई येथे राहणारे प्रसिद्ध कलादिग्दर्शक सुनील थळे यांचा १८ वर्षाचा मुलगा कु. श्रेयस थळे याने स्वतः घरात शाडूची बाळ गणेश मूर्ती साकारली आहे. त्याच्या या कलेचं परिसरातील नागरिकांकडून आणि सोशल मीडियातून कौतुक होतंय. गेल्या दोन वर्षांपासून तो स्वतः यु ट्यूब वर गणपती कसे बनवतात ते पाहून स्वतःच घरी गणपती बनवण्याचा प्रयत्न करत त्याने या कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये एक आवड म्हणून प्रथम एक गणेश मूर्ती साकार केली. ती पाहून त्यांच्या मित्र परिवारांनी त्याला प्रोत्साहन दिले आणि अजून 3 गणेश मूर्त्या त्याने बनविल्या, अशी माहिती सुनील थळे यांनी लोकमतला दिली.
सुनील थळे (गोरेगाव फिल्मसिटी) हे चित्रपट क्षेत्रात गेली 20 वर्षे काम करीत असून त्याने आजपर्यंत मराठी हिंदी असे अनेक चित्रपटांचे कला दिग्दर्शन केले आहे. आज त्यांचा मुलगा श्रेयस थळे यानेसुद्धा कला क्षेत्रात आपलं भविष्य यशस्वी करण्यासाठी लहानपणापासूनच अनेक कला स्पर्धेत भाग घेऊन प्रमाणपत्र आणि बक्षीसे जिंकली आहे. तो यंदा 12 वीची परिक्षा पास झालाय. आता, मॉडेल आर्टला अँडमिशन घेणार आहे. यावर्षी त्याने प्रसिद्ध मूर्तिकार विशाल शिंदे यांच्याकडून प्रेरणा घेऊन सुंदर बाल गणेश मूर्ती साकारली. त्याचे सर्वच स्तरातून कौतूक आणि अभिनंदन केले.
विशेष म्हणजे सदर बाल गणेशाचे दर्शन घेण्यासाठी स्थानिक खासदार गजानन कीर्तिकर, दिंडोशीचे आमदार, माजी महापौर सुनील प्रभू, मुंबईचे उपमहापौर अँड. सुहास वाडकर, स्थनिक राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्ते तसेच चित्रपट सृष्टीतील अनेक कला दिग्दर्शकांनी थळे यांच्या घरी भेट देऊन श्रेयसचे कौतुक केले.