तरुणाने पेटविला लोकलचा डबा
By admin | Published: January 25, 2016 02:37 AM2016-01-25T02:37:23+5:302016-01-25T02:37:23+5:30
बेरोजगार असणाऱ्या आणि घरच्या परिस्थितीला कंटाळलेल्या तरुणाने लोकलचा महिला डबा पेटविल्याची घटना रविवारी पहाटे घडली.
मुंबई : बेरोजगार असणाऱ्या आणि घरच्या परिस्थितीला कंटाळलेल्या तरुणाने लोकलचा महिला डबा पेटविल्याची घटना रविवारी पहाटे घडली. चर्चगेट-मरिन लाइन्स स्थानकांदरम्यान घडलेल्या या घटनेनंतर २८वर्षीय तरुणाला रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) अटक केली.
शनिवारी रात्री चर्चगेट ते मरिन लाइन्स स्थानकांदरम्यान एक रिकामी लोकल उभी करण्यात आली होती. रविवारी पहाटे ४च्या सुमारास लोकलजवळ उभ्या असलेल्या आकाश घोरडे या तरुणाने लोकलच्या एका महिला डब्याला (अर्धा फर्स्ट क्लास आणि अर्धा सेकंड क्लास डबा) पेटवून दिले. या आगीत डबा पूर्णपणे जळाला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, रेल्वे पोलीस आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि ही आग अर्धा तासात आटोक्यात आणली. घोरडे याला रेल्वे पोलिसांकडून तत्काळ अटक करण्यात आली. त्याच्याकडून गुन्हा कबूल करण्यात आल्याने चर्चगेट जीआरपीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत चर्चगेट जीआरपीचे पोलीस उपनिरीक्षक काशिनाथ कुंभारे यांनी सांगितले की, मूळचा नागपूरचा असणारा आकाश घोरडे हा पाच महिन्यांपासून मुंबईत राहत होता. एका हॉटेलमधील नोकरी गेल्यानंतर तो कॅटररकडे कामाला लागला. मात्र बारावी शिक्षण झालेल्या घोरडेने हीदेखील नोकरी सोडली होती. त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे दिसत आहे. नागपूरला असतानाही घोरडे हा तीन महिने जेलमध्ये होता. याबाबत चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले. स्टॅबलिंग लाइनवर उभ्या असलेल्या लोकलची अंतिम तपासणी मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास ड्युटीवर असलेल्या आरपीएफ जवानाकडून करण्यात आली होती.