‘तो’ तरुण तीन महिन्यांनंतर परतला
By admin | Published: June 4, 2017 02:57 AM2017-06-04T02:57:43+5:302017-06-04T02:57:43+5:30
माहीममधून अचानक गायब झालेला अशरफ सय्यद (२०) हा तरुण इसिसमध्ये गेल्याच्या संशयामुळे कुटुंबीय चिंतेत होते. अखेर तीन महिन्यांनंतर तो घरी परतल्याने कुटुंबीयांनी
- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : माहीममधून अचानक गायब झालेला अशरफ सय्यद (२०) हा तरुण इसिसमध्ये गेल्याच्या संशयामुळे कुटुंबीय चिंतेत होते. अखेर तीन महिन्यांनंतर तो घरी परतल्याने कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. तो इसिसमध्ये भरती झाला नसून शिर्डीतील एका हॉटेलमध्ये काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.
माहीमच्या वांजेवाडी परिसरात अशरफ हा कुटुंबासह राहायचा. २७ फेब्रुवारीपासून तो बेपत्ता आहे. तो सोशल मीडियावर सक्रिय असायचा. सायबर कॅफेत तासन्तास इंटरनेटवर असायचा. त्याच्या इंटरनेटचा, खाण्यापिण्याचा खर्च कोण करत होते, असा प्रश्न अशरफच्या भावाला सतावत होता. तो इसिसमध्ये सहभागी तर झाला नाही ना, अशी शंका कुटुंबीयांना होती. त्यानुसार तपास यंत्रणांनी त्याचा शोध सुरू केला. दरम्यान, तो शिर्डीत असल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाली. शिर्डी येथील साई प्रसाद हॉटेलचा मालक लक्ष्मण जाधव याला १ मार्च रोजी अशरफ शिर्डीच्या बसथांब्यावर जखमी अवस्थेत सापडला. तेव्हा तो काहीही बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हता. त्याला काहीच आठवत नव्हते. तो फक्त भूक लागली आहे, एवढेच म्हणाला. त्याच्याकडील पॅनकार्डवरून त्याला त्याचे नाव समजले. त्याने अशरफला जेवण दिले. त्यानंतर अशरफ इंग्रजीत बोलत असल्याने जाधवने त्याला हॉटेल सांभाळण्याचे काम दिले होते. तो नेहमी अशरफला त्याच्या कुटुंबीयांबाबत विचारायचा. मात्र, अशरफ काहीही माहिती देत नव्हता. दरम्यान, १ जूनच्या रात्री फेसबुकवर मित्राची माहिती शोधत असताना त्याला अशरफचा भाऊ सय्यद मोहम्मद आदिल यांची पोस्ट दिसली. यामध्ये अशरफच्या फोटोसह मोबाइल क्रमांकही होता. त्याने तत्काळ त्या क्रमांकावर फोन करून भावाला अशरफची माहिती दिली. मात्र याबाबत अशरफला काही सांगितले नाही. २ जून रोजी अशरफच्या आई आणि भावाने हॉटेल गाठले. तेव्हा अशरफला समोर पाहून त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. तीन महिन्यांनंतर कुटुंबीयांच्या भेटीने अशरफचेही अश्रू अनावर झाले. जाधव याने मुलाला सांभाळून आमच्यावर उपकार केल्याची प्रतिक्रिया अशरफची आई रेहाना सय्यद यांनी ‘लोकमत’ला दिली.