लोन सेटलमेंटच्या नावाखाली गंडा घालण्यासाठी तरुणाने थाटले कॉल सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:06 AM2021-01-14T04:06:55+5:302021-01-14T04:06:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : नॉन-बँकिंग संस्थांकड़ून कर्ज घेतलेल्या कर्जदारांना तडजोडीच्या नावाखाली गंडा घालण्यासाठी तरुणाने घाटकोपरमध्ये कॉल सेंटर थाटल्याचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नॉन-बँकिंग संस्थांकड़ून कर्ज घेतलेल्या कर्जदारांना तडजोडीच्या नावाखाली गंडा घालण्यासाठी तरुणाने घाटकोपरमध्ये कॉल सेंटर थाटल्याचा धक्कादायक प्रकार शिवाजी पार्क पोलिसांच्या कारवाईतून उघड़कीस आला आहे. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी बुधवारी ११ जणांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी पार्क परिसरात राहणाऱ्या तक्रारदाराने बजाज फायनान्स आणि इंडिया बुल्स कंपनीकड़ून कर्ज घेतले होते. अशात याच टोळीतील ठगाने कॉल करून संबंधित संस्थेचा अधिकारी असल्याचे सांगत, लोन सेटलमेंटची योजना सुरू असल्याचे सांगितले. त्यांच्या दीड लाखांच्या कर्जाची अवघ्या ४० हजार रुपयांत सेटलमेंट करून देण्याचे आश्वासन दिले. तक्रारदाराने विश्वास ठेवून पैसे भरले. डोक्यावरचे कर्ज संपल्याने निवांत असलेल्या तक्रारदाराला थकीत कर्जाबाबत विचारणा केली. त्यांनी पैसे भरल्याचे सांगताच अशी कुठलीच योजना नसल्याचे त्यांनी सांगितले. यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला.
त्यानुसार, शिवाजी पार्कचे साहाय्यक निरीक्षक पांढरी कांदे आणि पथकाने तांत्रिक तपास करून घाटकोपर येथील कैलास एक्सप्लनेड संकुलातील कॉल सेंटरवर छापा घातला. तेथे सात तरुण शहरातील विविध संस्थांकडून कर्ज घेतलेल्या व्यक्तींशी संपर्क साधून तडजोडीच्या नावाखाली गंडवत असल्याचे समोर आले. त्यानुसार या सेंटरचा प्रमुख सोमनाथ दास (वय २०) या तरुणालाही बेड्या ठोकल्या आहेत. एकूण ११ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी अशा प्रकारे शेकडो जणांची फसवणूक केल्याचा संशय पथकाला आहे.
...
१५० सिमकार्डे जप्त
आरोपीने बनावट कागदपत्रांच्या आधारे घेतलेली १५० सिमकार्डेही पोलिसांनी जप्त केली आहेत.
...