मुंबई : दिंडोशी येथील सॅटेलाईट टॉवरच्या २४ व्या मजल्यावरून फरशी पडून डोक्यावर आदळल्याने आदित्य जमगेकर (वय १८) हा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
आदित्य हा कुटुंबाचा एकमेव आधार आहे. मात्र, त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेवेळी सापडलेला फरशीचा तुकडा दिंडोशी पोलिसांनी सॅटेलाईट टॉवरमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या घरात जाऊन तपासला. त्यावेळी २४ व्या मजल्यावर सात वर्षांच्या मुलासोबत राहणाऱ्या जोडप्याने नुकतेच घराचे काम केले आणि उर्वरित फरशीचे तुकडे हे खिडकीत निष्काळजीपणाने ठेवले. त्यांचा लहान मुलगा घरात मोलकरणीसोबत एकटा असताना हा प्रकार घडला. त्यामुळे पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती दिंडोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धरणेंद्र कांबळे यांनी दिली.