Join us

मुंबईत भररस्त्यात तरुणाची धारदार शस्त्राने हत्या; महिलेसह चौघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 5:13 PM

मुंबईच्या गोवंडी परिसरात भररस्त्यात एका तरुणाची अल्पवयीन मुलाने तलवारीने वार करुन हत्या केली

Mumbai Crime : मुंबईच्या गोवंडी परिसरातून हादरवणारी घटना समोर आली आहे. भररस्त्यात अल्पवयीन मुलांनी तलवारीने वार केल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. या भयंकर घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये तरुणावर वारंवार तलवारीने हल्ला होत असताना तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आतापर्यंत एका महिलेसह चार आरोपींना अटक केली आहे. दुसरीकडे, या घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली असून पोलिसांचा धाक उरला आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मुंबईतील शिवाजी नगर परिसरात ८ ऑगस्ट रोजी ही धक्कादायक घटना घडली असून पाच दिवसांनी हा प्रकार समोर आला आहे. अहमद पठाण नावाच्या व्यक्तीवर तीन ते चार जणांसह अल्पवयीन मुलाने तलवारीने वार केल्याची संतापजनक घटना घडली. या भीषण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये अहमद पठाण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसत आहे. व्हिडीओमध्ये आजूबाजूला लोक उपस्थित असूनही त्यांनी अहमदला मदत न केल्याचे दिसत आहे.

पठाण हा शिवाजी नगर येथील रस्त्यावर उभा होता तेव्हा त्याच्या समोर अल्पवयीन मुलासह ३-४ जण आले. त्या मुलाने पठाणवर तलवारीने जोरदार हल्ला चढवला. त्यानंतर अल्पवयीन मुलाने त्याच्या मदतीला येण्याचा विचार करणाऱ्या लोकांनाही धमकावले. पठाण जमिनीवर निपचित पडेपर्यंत मुलाचा हल्ला सुरूच होता. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, आतापर्यंत एका महिलेसह चार संशयितांना अटक करण्यात आली आहे.

या घटनेची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तात्काळ जखमी अवस्थेत अहमदला राजावाडी रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी मोहम्मदला मृत घोषित केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पठाण आणि आरोपी एकमेकांना ओळखत असून, दोन आठवड्यांपूर्वी त्यांच्यात जोरदार वाद झाला होता. पठाणवरही अनेक गुन्हे दाखल आहेत. दोघांचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी असताना पोलिसांनी तातडीने कारवाई करायला हवी होती. कारवाई न झाल्यामुळे भररस्त्यात अशा घटना घडत आहेत, असं म्हणत स्थानिकांनी पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी ठाण्यातील राबोडी भागातही अशाच प्रकारची धक्कादायक घटना घडली होती. ४० वर्षीय वसीम कुरेशी या व्यक्तीवर पूर्व वैमनस्यातून तलवार आणि चाकूने हल्ला केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली होती. या हल्ल्यामुळे स्थानिकांमध्ये घबराट पसरली होती. दुकान मालकांनी तात्पुरते त्यांचे व्यवसाय बंद केले होते.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीमुंबई पोलीस