लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गोवंडीतील न्यू गौतमनगरात एका तरुणाची निर्घृण हत्या करणाऱ्या मारेकऱ्याला दहा तासांच्या आत अटक करण्यात पोलिसांना यश आले. मुख्तार मूर्तजा खान ऊर्फ लाला (वय ३७) असे त्याचे नाव असून, देवनार पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
किरकोळ कारणावरून त्याने खंडू मारुती दहीभाते (४६) यांच्या मानेवर तीक्ष्ण हत्याराने वार केले होते. न्यू गौतमनगरात भीमवाडी येथे राहत असलेले खंडू दहीभाते मंगळवारी रात्री राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आले होते. त्यांच्या मानेवर तीक्ष्ण हत्याराने वार केले. खून केल्यानंतर आरोपींनी घराला बाहेरून कुलूप लावून पलायन केले होते. त्याबाबत त्यांचा भाऊ बंडू दहीभाते यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरातील फुटेजची पाहणी व परिसरातून घेतलेल्या माहितीवरून त्याच्या शेजारी राहत असलेल्या लालानेच ही हत्या केल्याचे स्पष्ट झाले. विविध ठिकाणी पथके पाठवून त्याचा शोध घेण्यात आला. देवनार विभागाचे सहायक आयुक्त एम. एम. मुजावर, वरिष्ठ निरीक्षक सावळाराम आगवणे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने त्याचा शोध घेतला.