पोलिसांमुळे वाचले तरुणाचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:06 AM2021-04-03T04:06:54+5:302021-04-03T04:06:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मी आत्महत्या करतोय, असा व्हॉट्सॲप संदेश पाठवून मेहुण्याने घर सोडल्याची माहिती मिळताच, सायबर पोलिसांनी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मी आत्महत्या करतोय, असा व्हॉट्सॲप संदेश पाठवून मेहुण्याने घर सोडल्याची माहिती मिळताच, सायबर पोलिसांनी शोध सुरू केला. पुणे ग्रामीण आणि रायगड पोलिसांच्या मदतीने तरुणाचा शोध घेत त्याला सुखरूप कुटुंबीयांपर्यंत पोहोचविण्यास पोलिसांना यश आले.
शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास एकाने सायबर पोलीस ठाणे गाठून, मी आत्महत्या करतोय, असा व्हॉट्सॲप संदेश मेहुण्याने पाठवून घरातून निघून गेल्याचे सांगितले. सायबर पोलिसांनी तत्काळ याबाबत अधिक तपास सुरू केला. यात, संबंधित तरुण पुणे ग्रामीण भागात असल्याची माहिती मिळताच त्यानुसार संबंधित पोलिसांना याबाबत कळविण्यात आले. ग्रामीण पोलिसांनी तत्काळ त्याचा शोध घेत त्याचे समुपदेशन केले. रात्री पावणे नऊच्या सुमारास राजगड पोलिसांच्या मदतीने त्याला सुखरूप घरी पाेहोचविण्यात आले. तरुणाचे प्राण वाचले म्हणून त्याच्या मुंबईतल्या नातेवाइकांनी सायबर पोलिसांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.