पुण्यात तरूणीला वाचवणाऱ्या योद्ध्यांनी एक हक्काची मागणी केले ती देखील पूर्ण करणार - आव्हाड
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 07:09 PM2023-06-29T19:09:50+5:302023-06-29T19:10:26+5:30
पुण्यात तरुणीवर भर दिवसा एका माथेफिरूने कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याच्या घटनेनंतर संपूर्ण राज्यात एकच खळबळ माजली.
मुंबई : पुण्यात तरुणीवर भर दिवसा एका माथेफिरूने कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याच्या घटनेनंतर संपूर्ण राज्यात एकच खळबळ माजली. पुण्यात कायदा सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न उपस्थित झाला. माथेफिरूने केलेल्या हल्ल्यात एका तरुणीचा जीव वाचवणाऱ्या तीन जिगरबाज योद्ध्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील त्यांची भेट घेऊन त्यांनी सांगितल्याप्रमाणे पारितोषिक दिले आहे. आव्हाडांनी लेशपाल जवळगे, हर्षद पाटील, दिनेश मडावी या तीन तरुणांची भेट घेतली, ज्यांनी आपल्या जीवाची बाजी लावत एका तरुणीचा जीव वाचवला. इतकंच नव्हे तर हल्ला करणाऱ्या तरुणाचा जीव देखील या युवकांनी वाचवला आहे.
तीन योद्ध्यांशी संवाद साधल्यानंतर आव्हाडांनी म्हटले, "या तिघांसोबत गप्पा मारत असताना एक गोष्ट मात्र जाणवली आणि सुखद धक्का बसला. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या मार्गावर चालणारी ही मुलं आहेत. सदर घटना घडल्यानंतर ते अचानक प्रसिद्धीच्या झोतात आले. अनेकांनी त्यांची काळजीपोटी चौकशी केली. परंतु अनेकांनी त्या हल्लेखोरांची जात विचारून त्यांना हैराण केले. मुलीची जात विचारून तिची ओळख नेमकी काय आहे, हे विचारण्यापर्यंत काहींची मजल गेली. या प्रकाराने ही मुलं दुःखी दिसली. याबद्दल बोलताना त्यांचा सामूहिक सूर असा दिसला की, 'आम्ही जात बघून त्या मुलीला वाचवलं नाही. आमच्या समोर एका मुलीचा जीव जातोय आणि अशावेळी आम्ही षंढासारखे गप्प बसू शकत नव्हतो. आपल्या बहिणीची रक्षा केली पाहिजे, या विचाराने आम्ही तिचा जीव वाचवला."
पुण्यात माथेफिरूने केलेल्या हल्ल्यात,एका तरुणीचा जीव वाचणाऱ्या तीन जिगरबाज योद्ध्यांना आज भेटलो.लेशपाल जवळगे,हर्षद पाटील,दिनेश मडावी या तीन तरुणांनी आपल्या जीवाची बाजी लावत एका तरुणीचा जीव वाचवला.इतकंच नव्हे तर हल्ला करणाऱ्या तरुणाचा जीव देखील या युवकांनी वाचवला आहे.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 29, 2023
या… pic.twitter.com/CNsDiO30wx
तसेच विचारांनी प्रगल्भ आणि शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार समर्थपणे पुढे घेऊन जाणारे हे वाघ आहेत. अशी तरुण मंडळी या समाजात मोठ्या संख्येने निर्माण झाली तर आपल्या राज्याचं भविष्य नक्कीच उज्वल असेल यात शंका नाही. मी शब्द दिला होता त्याप्रमाणे, तिघांना पारितोषिक दिले आहे. या तिन्ही मुलांनी एक प्रेमळ आणि हक्काची मागणी केली की, त्यांना पवार साहेबांना भेटायचं आहे आणि लवकरच मी त्यांची ही मागणी देखील पूर्ण करणार आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी आणखी सांगितले.
घटनेनंतर शहर पोलीस दल खडबडून जागे
तरुणीवर भर दिवसा एका माथेफिरूने कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याच्या घटनेनंतर संपूर्ण शहर पोलिस दल खडबडून जागे झाले. महाविद्यालयीन विद्यार्थिनी, महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथकांची गस्त वाढविण्यात येणार असून, बीट मार्शलची संख्या वाढवली जाणार असल्याचे पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी सांगितले. तर आता पुण्यात कोयता घेऊन फिरणाऱ्यांचे प्रमाणही वाढत चालले आहे. अशा माथेफिरूंना तुम्ही हातात कोयता घेऊन तर दाखवा मग आम्ही बघतो असा सज्जड दम पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल यांनी दिला आहे.